लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
सह्याद्री मल्टिसिटी निधी कंपनीच्या माध्यमातून अनेकांकडून ठेवी गोळा करुन त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेला क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सर्वेसर्वा संदीप सुधाकर थोरात
(मूळ रा. रांजणी माथणी, तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर, कार्यालयाचा पत्ता : शेवगाव, अहिल्यानगर) याला शेवगाव पोलिसांनी अहिल्यानगरच्या पाईपलाईन रोड परिसरात अटक केलीय.
क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन या कंपनीत पैसे गुंतविल्यास पंधरा टक्के परतावा (रिटर्न्स) देण्याचे आमिष दाखवित संदीप थोरात आणि त्याच्या अनेक सहकाऱ्यांनी आर्थिक फसवणूक केल्याबाबत गोरख सिताराम वाघमारे (रा. नवीन तहसील कार्यालयासमोर पाथरे, ता. शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. आर्थिक गुंतवणुकीच्या या व्यवहारात तक्रारदार वाघमारे यांची तब्बल 23 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.
दरम्यान, संदीप थोरात यांच्याविरुद्ध करण्यात आलेले अटकेच्या कारवाईमुळे त्याने फसवणूक केलेल्या अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सह्याद्री मल्टिसिटी निधी कंपनी स्थापन करून मोठमोठे होर्डिंग लावून जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना भुलविण्याचं काम संदीप थोरात याने केलं. गुंतवणूकदार पैसे मागायला आल्यानंतर त्यांच्याशी अतिशय गोड बोलून गुंतवणूकदारांचा केसांना गळा कापण्याचं पाप थोरात यानं केलंय. या पापाचा घडा भरल्यानंतर संदीप थोरातला अखेर गजाआड व्हावं लागलं. आतापर्यंत थोरात याने ज्यांची ज्यांची आर्थिक फसवणूक केली आहे, असे अनेक गुंतवणूकदार जिल्हा पोलीस प्रशासनाला तक्रारी देण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत.