लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
तब्बल 50 कोटी रुपयांच्या ठेवींचा आर्थिक घोटाळा करणारा भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या वित्तीय संस्थेचा संस्थापक अध्यक्ष भारत पुंड याला काल (दि. १) पंढरपुरात अटक करण्यात आली. अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलीय.
भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये अहिल्यानगरच्या ठेवीदारांनी तीस कोटी आणि छत्रपती संभाजीनगरच्या ठेवीदारांनी वीस कोटी अशा 50 कोटी रुपयांच्या ठेवी गुंतवल्या आहेत. या मल्टीस्टेटचा संस्थापक अध्यक्ष भारत पुंड याच्याविरुद्ध अहिल्यानगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले तीन ते चार महिने तो फरार होता. मात्र अहिल्यानगर जिल्ह्याचे एसपी राकेश ओला यांनी एमआयडीसी पोलिसांना पुंड याच्या अटकेसंदर्भात अत्यंत कडक स्वरुपाच्या सूचना दिल्या. दरम्यान, पुंड याला अटक करण्यात आल्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी मिळण्याचा मार्ग काहीसा सोपा झाल्याचं बोललं जात आहे.
येत्या शनिवारी भाग्यलक्ष्मी 500 ठेवीदार एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर हे आंदोलन करणार होते. परंतु पुंड याला अटक करण्यात आल्यामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. अत्यंत गोड बोलून केसानं गळा कापणारा भारत पुंड याला या आर्थिक घोटाळ्यात आणखी कोणाकोणाचे मार्गदर्शन लाभलं आहे, त्याच्यासोबत आणखी कोण कोण आहेत, मल्टीस्टेट आणि मल्टीसिटी निधी कंपन्यांयामध्ये मध्यंतरी कोट्यवधी रुपयांचा जो आर्थिक घोटाळा झाला, त्यात भारत पुंड याच्यासह आणखी किती जणांचा सहभाग आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासानंतरच मिळणार आहेत.