लोकपत न्युज नेटवर्क / नवीदिल्ली / प्रतिनिधी
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. काँग्रेसचे खासदार अभिषेक मनु सिंगवी यांच्या 222 नंबरच्या बाकाखाली नोटांचा बंडल आढळला आहे. या घटनेमुळे संसदेच्या परिसरात प्रचंड गोंधळ उडाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपच्या खासदारांनी केली आहे.
दरम्यान, राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. आज (दि. ६) सकाळी 11 : 23 वाजता सभापती धनखड यांनी याविषयीचा उल्लेख करत नोटांचा हा बंडल 222 क्रमांकाच्या सीटवर आढळून आला असून हे बाक काँग्रेसचे खासदार अभिषेक मनु सिंगवी यांच्या नावावर आहे, अशी माहिती देत हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचा आरोप सभापती यांनी धनखड केला आहे.
दरम्यान, अभिषेकमनू सिंगवी यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे, की माझ्याकडे फक्त पाचशे रुपयांची एक नोट आहे. त्या नोटाच्या बंडलाशी माझा काहीही संबंध नाही. मात्र सभागृहात हा मुद्दा उचलून धरत इतर विरोधी पक्षांनीदेखील यावर आक्षेप घेतला आहे.
संसदेच्या सभागृहात आढळून आलेल्या नोटांच्या बंडलातील नोटा खऱ्या आहेत की खोट्या, याविषयी मात्र अद्याप कुठली ठोस माहिती मिळालेली नाही. या निमित्ताने संसद भवनातल्या सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुराव्यांची खातरजमा केली जात आहे.
या संदर्भात भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे की, संसद ही लोकशाहीची पवित्र जागा आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रकार खूपच गंभीर असून यामुळे संसदेची प्रतिमा खराब होत आहे.
या संदर्भात काँग्रेस पक्षाने अद्यापही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र काँग्रेसच्या काही नेत्यांनी नोटांच्या बंडलाचा हा प्रकार विरोधकांचं कटकारस्थान असल्याचं म्हटलंय. या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे व्हायला हवा, अशी अपेक्षा ही काँग्रेसच्या खासदारांनी व्यक्त केली आहे.