लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई / प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे नक्की कोण आहे, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. कारण मयत सरपंच देशमुख यांच्या हत्येचा महत्त्वाचा एक व्हिडिओ सीआयडी पोलिसांच्या हाती लागला आहे. आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ आढळून आला आहे.
विशेष म्हणजे घुले याच्या मोबाईलवरून एका वरिष्ठ नेत्याला अनेक वेळा फोन झालेले आहेत हा वरिष्ठ नेता कोण, याविषयी आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान या हत्याकांडाचा ‘मास्टरमाईंड’ ज्यांना म्हटलं जातं, ते वाल्मीक कराड कर्नाटक किंवा मध्यप्रदेशात असल्याचे बोलले जत आहे. कराड यांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी या निमित्याने केली जात आहे.
सीआयडीला आढळून आलेल्या या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे, मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात काही महत्त्वाचा खुलासा या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे का, जर घुले याच्या मोबाइलद्वारे वरिष्ठ नेत्याला कॉल करण्यात आले असतील तर तो वरिष्ठ नेता कोण, त्या वरिष्ठ नेत्यापर्यंत सीआयडी पोलीस पोचणार का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.