लोकपत न्यूज नेटवर्क नागपूर / विधिमंडळ प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात सातत्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड ही दोन नावं चर्चेत येत आहेत. विशेष म्हणजे या हत्याकांडामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. त्यांच्या मंत्रीपदाच्या मार्गातदेखील अनेक प्रकारचे अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्याकांडात ज्यांचा सहभाग आहे, असे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड लवकरच केज पोलिसांना शरण जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
दि. 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. अवादा या पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयांची खंडणी ज्यांनी मागितली आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे ‘मास्टर माईंड’ असल्याचे आरोप ज्यांच्यावर होत आहेत, ते वाल्मिक कराड सरपंच देशमुख यांची हत्या झाल्यापासून फरार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी असा दावा केलाय, वाल्मिक कराड हे नागपूरमध्येच असून ते कुठे आहेत, हे मला माहित आहे. त्यांचा पत्ता मी देऊ शकतो. दानवे यांच्या या दाव्यासंदर्भात बोलताना आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांनीही दानवे यांनी कराड यांचा पोलिसांना पत्ता द्यावाच, असं आवाहन केलंय. यामध्ये मी दोषी आढळलो तर फाशी द्या, असा पवित्रादेखील मुंडे यांनी घेतलाय.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलं आहे. वाल्मिक कराड हे कोणाच्या जवळचे आहेत, याचा कुठलाही विचार न करता ते जर दोषी आढळले तर कठोर शिक्षा केली जाईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृह बोलताना सांगितलं होतं.
धनंजय मुंडे हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र यामध्ये अडचण निर्माण होऊ नयेत, यासाठी वाल्मिक कराड आज किंवा उद्या केज पोलिसांना शरण जाणार असल्याचं बोललं जात आहे.