लोकपत डिजिटल मीडिया / मुंबई
राज्य शासनाने आज (दि. ३) महाराष्ट्रातल्या डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या संपादक आणि पत्रकारांसाठी मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. डिजिटल मीडियामधील चॅनल्स आणि वेबपोर्टल्सना आता राजमान्यता देऊन त्यांना सरकारी जाहिरात देण्याबाबतचे परिपत्रक आज (दि. ३) अधिकृतरित्या जाहीर केलं आहे.
वरिष्ठ पत्रकार राजा माने
यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना गेली सहा वर्षे या मागणीसाठी शासन दरबारी अथक प्रयत्न करीत आहे.
महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत तसेच ग्रामीण भागापासून मेट्रो सिटीपर्यंत विस्तृत जाळे असलेल्या डिजिटल मीडियामधील संपादक आणि पत्रकारांना याचा लाभ होणार आहे.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या भिलार, महाबळेश्वर आणि कनेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या महाअधिवेशनादरम्यानसुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणं उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उच्च – तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबत संघटनेला आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीसुद्धा महायुतीच्या सर्व नेत्यांनी केल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित दादा पवार चंद्रकांत दादा पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातल्या डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना याचा लाभ होणार असून संघटनेने केलेल्या योग्य पाठपुराव्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासात हा आजचा निर्णय म्हणजे क्रांतिकारक निर्णय आहे.
डिजिटल मीडिया संघटनेचा राजा माने यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी पाठपुरावा…!
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातली सर्वात मोठी पत्रकारांची संघटना असून देशभरातील१२ हजार हून अधिक डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकार या संघटनेचे सभासद आहेत. सन २०१९ पासून शासन दरबारी पाठपुरावा करुन डिजिटल मीडियाला राज मान्यता आणि शासकीय जाहिराती मिळण्याबाबत सतत प्रयत्नशील राहिल्यानं अखेर यश मिळालं आहे.