लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
गेल्या २५ वर्षांपासून ज्या प्रश्नावर नेवाशाच्या लोकप्रतिनिधींनी केवळ राजकारण केलं, या प्रश्नाचं सातत्यानं भिजत घोंगडं ठेवून अनेक राजकीय नेत्यांनी मतांचं राजकारण केलं. परंतू स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही नेवासे तालुक्यातल्या शिंगवे तुकाई हे गाव पाण्याच्या समस्येनं त्रस्त झालं आहे. त्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून या गावाच्या स्थानिक ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केलंय. या ग्रामस्थांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असूनही जिल्हा प्रशासनानं या उपोषणाची म्हणावी तशी दखल घेतली नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय.
या गावातल्या संकेत पवार, पांडूरंग होंडे, स्वप्निल पवार, नवनाथ पवार, कारभारी पवार, पांडूरंग पवार, ज्ञानदेव पवार, दत्तात्रय पवार, अनिल होंडे, प्रवीण गायकवाड, प्रवीण पवार, सुदामराव पवार, संभाजी होंडे, विठ्ठल पवार, भाऊसाहेब पवार, आदिनाथ पवार, रविंद्र पवार, उद्धव पवार, गणेश भिसे, संतोष पवार, अमोल पवार आदी ग्रामस्थांनी या उपोषणात भाग घेतला.
वांबोरी चारीचा प्रश्न सुटल्यास शिंगवे तुकाई या गावातल्या ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे या गावाच्या आजूबाजूला असलेल्या अनेक गावांत वांबोरी चारीचं पाणी जात आहे. परंतू या गावात वांबोरी चारीचे पाणी आलंच नाही. वांबोरी चारीचं पाणी आल्यानंतर या गावातल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली येणार आहेत. त्यामुळे वांबोरी चारी या शेतकऱ्यांसाठी मोठं वरदान ठरणार आहे. मात्र हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे शिंगवे तुकाई या गावातल्या ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी पहायला मिळत आहे.