बाळासाहेब शेटे पाटील
मो. नं. ७०२८३५१७४७
लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
‘बाप तैसा बेटा’ ही म्हण बीडमध्ये प्रत्यक्षात उतरली आहे. केज तालुक्यातल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमागे वाल्मिक कराड हेच असल्याचं आता सगळीकडे बोललं जात आहे. विशेष म्हणजे राज्याच्या हिवाळी अधिवेशनातदेखील यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सुरुवातीला आम्ही बाप तैसा बेटा या म्हणीचा जो उल्लेख केला आहे, या संदर्भातली एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील याने एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिचा विनयभंग केल्याची चर्चा आता ऐकायला मिळत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणार नाही, याचीसुद्धा काळजी घेण्यात आली आहे.
राज्यकर्त्यांचा जेव्हा एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला वरदहस्त असतो, त्यावेळी ती व्यक्ती समाजात काहीही उपद्व्याप करते, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे वाल्मिक कराण आणि त्यांचा मुलगा सुशील कराड हे आहे. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या मर्जीतले आहेत.
स्वतः मुंडे यांनीही तशी कबुली दिली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे जी हत्या करण्यात आली, त्यामागे कराड यांचा हात असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर कराड मात्र गुन्हा घडल्यानंतर गेल्या दिवसांपासून फरार आहेत. पोलिसांना त्यांचा शोध लागत नाही, अशी परिस्थिती अजिबात नाही. याचाच अर्थ पोलीस यंत्रणेत कोणी तरी हस्तक्षेप करत आहे, हे स्पष्ट आहे.
सुशील वाल्मिक कराड याने ज्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करत तिचा विनयभंग केला, ती अल्पवयीन मुलगी दुर्दैवानं ओबीसी समाजाची आहे. गुन्हा करणारासुध्दा ओबीसी समाजाचाच आहे. याचा अर्थ त्या अल्पवयीन मुलीला न्याय मागायचाच नाही का?
अन्याय विरुद्ध आवाज न उठवता तुम्ही आम्ही जर असं नुसतच पहात बसलो, तर उद्या गुन्हेगारीचं हे लोण तुमच्या आमच्या घरापर्यंत कधी आलं, हे कोणालाच कळणार नाही. वाईट मार्गाचा अवलंब करून बुद्धीपेक्षा जास्त पैसा मिळाला, की अशा प्रकारच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कृत्यांना प्रचंड ऊत येतो. स्वाभिमान जीवंत ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी राजांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या पुण्यभूमीत आपण सारे राहत आहोत. त्यामुळे अशा गुन्हेगारीविरुद्ध तुम्हाला आम्हाला नक्कीच आवाज उठवावा लागणार आहे. अन्यथा आणि घरातल्या अल्पवयीन मुलींच्या अब्रूचे धिंडवडे निघाल्याशिवाय राहणार नाहीत.
मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुमचे पोलीस वाल्मिक कराड यांना कधी जेरबंद करणार आहेत?
मयत सरपंच संतोष देशमुख
यांच्या हस्तेमागे जो कोणी असेल, मग तो कोण आहे, कोणाशी संबंधित आहे, कोणती भाषा बोलतो, त्याचा पाठीराखा कोण आहे, याचा कसलाही विचार न करता दोषी आढळणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बोलताना सांगितलं होतं. योगायोगानं म्हणा किंवा जाणीवपूर्वक म्हणा, गृह खातेसुद्धा मुख्यमंत्री फडणवीस
यांच्याकडेच आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला पंधरा दिवस उलटून गेले आहेत. तरीही यातला ‘मास्टरमाईंड’ पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुमचे पोलीस वाल्मिक कराड यांना कधी जेरबंद करणार आहेत, हाच एक प्रश्न सतावतो आहे.