लोकपत न्यूज नेटवर्क / बीड
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मीक कराड हाच असल्याचा आरोप करण्यात आला असला तरी सरपंच देशमुख यांच्या हत्येशी संबंध असल्याचा पुरावा आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागला नव्हता. परंतू, एसआयटीच्या तपासात देशमुख हत्याकांडातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि वाल्मीक कराड यांचं ‘थेट कनेक्शन’ आढळून आलं आहे. त्यामुळे कराड याचा पाय आणखी खोलात गेला आहे.
पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण झाल्याच्या प्रकरणातून सरपंच देशमुख यांची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. हा वाद होण्यापूर्वी सुदर्शन घुले याने वाल्मीक कराडबरोबर सहा डिसेंबर रोजी दोन वेळा फोनवरून संवाद साधला होता. पवनचक्कीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यापूर्वी घुले याने वाल्मीक कराडशी संपर्क साधला होता.
त्यानंतर सुदर्शन घुले आणि सरपंच देशमुख यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर पुन्हा एकदा सुदर्शन घुले याने वाल्मीक कराडशी संपर्क केला होता, असं एसआयटीच्या तपासातून समोर आलं आहे. सरपंच देशमुख हत्या आणि दोन कोटींच्या खंडणी प्रकरणाचा तपास एस आय टी करत आहे. या तपासात एसआयटीला मोठा पुरावा सापडला आहे.
सुदर्शन घुले याने सुरक्षारक्षकाला हल्ला करण्यापूर्वी करायला फोन केला होता आणि हल्ला केल्यानंतरसुद्धा कराडला फोन केला होता. याच वादातून सरपंच देशमुख यांची सुदर्शन घुले याने हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यामुळे या हल्ल्याशी वाल्मीक कराडचा संबंध जोडला जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, यापूर्वी खंडणी आणि खून प्रकरणातला आरोपी विष्णू चाटे याने कराडविरोधात मोठी कबुली दिली आहे. वाल्मीक कराडचं आपल्या फोनवरून अवादा पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं, अशी कबुली विष्णू चाटे याने दिली होती. यानंतर सुदर्शन घुलेबाबत पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. त्यामुळे वाल्मीक कराडच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. मिळालेले पुरावे एसआयटी कोर्टात सादर करणार आहे. त्यानंतर वाल्मीक कराडचं नाव सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी जोडले जाऊ शकतं.