लोकपत न्यूज नेटवर्क / पुणे / प्रतिनिधी
बीडच्या केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ पुण्यात काढण्यात आलेल्या मूक मोर्चामध्ये आमदार सुरेश धस प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. या हत्याकांडाचा प्रमुख वाल्मीक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आमदार धस यांनी मोठे खळबळजनक आरोप केले. नितीन कुलकर्णी आणि वाल्मीक कराड हे दोघे 17 मोबाईल नंबर वापरत असून नितीन कुलकर्णी कुठं बेपत्ता झाला आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून आमदार धस म्हणाले, ‘हात जोडून तुमच्या पाया पडतो. पण धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळातून काढून टाका. मंत्री मुंडे यांच्या सातपुडा या सरकारी बंगल्यावर अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत तीन कोटी रुपयांचा निवडणूक निधी देण्याची ‘डिमांड’ करण्यात आली. मात्र दोन कोटींत ‘डील’ दिल झाली, असा आरोपदेखील आमदार धस यांनी केला.
दरम्यान, आमदार धस यांनी केलेले हे आरोप सीआयडी, एसआयटी आणि बीड पोलिसांना कितपत खरे वाटतात, या आरोपांची पडताळणी किंवा शहनिशा या तीनही सरकारी तपास यंत्रणा करणार आहेत का, आमदार धस यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती सत्य आहे, याची स्विकृती राज्याचे गृहमंत्रालय करणार का, नितीन कुलकर्णी आणि आणखी एक फरार आरोपी याचा या सरकार तपास यंत्रणा शोध घेणार का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने चर्चिले जात आहेत.
गुन्हेगारी टोळ्यांच्या माध्यमातून जे लोक गुंडगिरी करत आहेत, ती कोणाच्याही आड लपले त्यांना सोडणार नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातल्या सर्वच आरोपींना कठोर शिक्षा देण्यात येईल, असा पुनरुच्चार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.