बाळासाहेब शेटे पाटील
लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
विधानसभेच्या निवडणुकीचा हंगाम संपला. आचारसंहितादेखील उठवली गेली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या २३ पैकी १६ कारखान्यांचं गळीत हंगाम सुरु झाला आहे. आचारसंहिता उठविण्यात आली असली तरी गळीत हंगाम सुरु झालेल्या काही कारखान्यांच्या संचालक मंडळानं ऊस दराच्या बाबतीत अद्यापही कुठलीच घोषणा केलेली नाही. त्यामुळे विधानसभेचा हंगाम संपून आता गळीत हंगामही सुरु झाला आहे. पण ऊसाच्या दराचं काय झालं, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत अनेक कारखान्यांचे अध्यक्ष आणि नेते पराभूत झाल्यामुळे या कारखान्यांच्या परिसरात अभूतपूर्व शांतता पसरली आहे. ऊस गाळप हंगामाच्या तोंडावर निवडणुकीचा हंगाम सुरु झाल्यामुळे ऊस दराच्या बाबतीत स्पर्धा होईल, असं वातावरण होतं. मात्र दुर्दैवानं तसं झालंच नाही.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या २२ कारखान्यांपैकी १६ कारखान्यांनाच गळिताचा परवाना मिळाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात १३ सहकारी आणि ९ खासगी कारखाने आहेत. या जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ६४९ हेक्टरवर गाळपासाठी ऊस उभा आहे.
अंबालिका, ज्ञानेश्वर, मुळा, बारामती, नागवडे, थोरात, कोल्हे, काळे हे कारखाने ऊसाला चांगला दर देण्यासाठी आघाडीवर असतात. मात्र यातल्या बहुतांशी कारखानदारांना यावेळच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मात्र ऊस दराबाबतची ही कोंडी कधी फुटते, याकडे ऊस उत्पादकांचं लक्ष लागलं आहे. ‘कुकडी’चे राहुल जगताप, ‘नागवडे’चे अनुराधा नागवडे, ‘केदारेश्वर’चे प्रताप ढाकणे, ‘ज्ञानेश्वर’चे चंद्रशेखर घुले, ‘मुळा’चे शंकरराव गडाख, ‘प्रसाद’चे प्राजक्त तनपुरे, थोरात कारखान्याचे बाळासाहेब थोरात यांचा या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे ऊसदरावर या पराभवाचा परिणाम होणार असल्याची भिती ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त केले जात आहे.