लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई
मुंबईच्या वर्सोवा भागातल्या एका हॉटेलात तो काम करायचा. काम कशाच? तर वेटरचं. त्याची आई माहेरात रहायची. वडील अचानक घर सोडून गेलेले. राधा नावाच्या त्या महिलेला तीन मुलं आणि एक मुलगी होती. या पोरानं न कळत्या वयात मुंबईचा रस्ता धरला. उडपीतल्या छोट्या गावातून आलेलं शाळेचं पोरं होतं ते. मुंबईच्या रंगीत दुनियेला पाहून भुलायच वय ते. त्यातही हा काम करायचा ते देखील बारमध्ये.
वर्सोवा भागतल्या बारमध्ये १९७९ च्या दरम्यान कोणतं वातावरण होतं, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्या काळात वेटर असणाऱ्या या पोराला पगार होता पाचशे रुपये. पोराच्या गोड बोलण्यामुळे महिना पाचशे रुपये टिपदेखील त्याला मिळायची.
माहेरातल्या एका छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर झोपडी बांधून राहणाऱ्या आपल्या आईला तो निम्मे पैसे पाठवायचां. घरची परिस्थिती त्यामुळेच सुधारू लागली. पण राहिलेल्या पैशाच काय? राहिलेल्या पैशातून पोरगं शिक्षणाची स्वप्न बघायचं. वेळ मिळाला की पुस्तक वाचायचं. हॉटेलचा मालक शहाणा होता. त्याने या पोराचा अभ्यास पाहिला आणि नाईट स्कुलला ॲडमिशन करुन दिलं. आत्ता हॉटेलमालकाच्या कृपेनं पोरगं शाळा शिकू लागलं. दहावी, बारावी झाली. गावाकडच्या आईला पोरगं कमवतंय याहून अधिक आनंद पोराच्या शिक्षणात मिळत होता.
वेटरसोबत पोरगं प्लंबर झालेलं आणि सोबत MSc देखील. त्याला भेटणाऱ्या माणसांना भारी वाटायचं. आमच्या टेबलवर दारु देणारा MSc आहे, इतकाच काय तो त्याचा मान वाढलेला.
अशाच एका रात्री त्यानं ठरवलं PSI परिक्षेचा फार्म भरायचा. मित्रांकडून माहिती घेतली. पोलिस होण्याचं स्वप्न पाहिलं. पण ते सहज शक्य नव्हतं. वेटर, प्लंबर अशी काम सोडून तो दादर इथल्या एका अभ्यासिकेत कामाला लागला. काम करत अभ्यास करणं याहून अधिकचा आनंद कशातच नव्हता.
बघता बघता त्या पोरानं PSI ची पोस्ट काढली. तेव्हा दुख: एकाच गोष्टीचं होतं. त्याचं कौतुक करायला त्याच्या जवळचं कोणीच नव्हतं. या पोराची पहिली पोस्टिंग झाली ती, जुहूच्या डिटेक्शन विंगमध्ये. वेटरचा शिक्का जावून अंगावर खाकी वर्दी आली होती. त्या वर्दीवर नेमप्लेट असायची, त्यावर लिहलं होतं.
‘सब इन्स्पेक्टर दया नायक’…!
आज त्या नावात वाटणारी दहशत तेव्हा नव्हती. तो नव्यानं दाखल झालेला एक पोलिस सब इन्स्पेक्टरच होता. शांतपणे तो नोकरी करत होता, पण अचानक एके दिवशी त्याच्या आयुष्यात, तो प्रसंग आला. त्याच्या समोर छोटा राजन टोळीतले दोन गुंड उभे होते. त्यांची दादागिरी पाहून सब इन्स्पेक्टर दया नायक त्यांच्यावर तुटून पडला. छोटा राजनच्या टोळीतल्या गुंडांवर हात टाकण्याचं धाडस एका पोलिस सब इन्स्पेक्टरनं केलं होतं.
एका रात्रीत मुंबईतल्या क्राईम स्टोरीवर लक्ष असणाऱ्या पत्रकारांच लक्ष त्याच्याकडे गेलं. हा कोण? याची चर्चा तेव्हाचे डेप्युटी पोलिस कमिशनर सत्यपाल सिंह यांच्या कानावर गेली. सत्यपाल सिंग यांनी या नव्या मुलात दम दिसतोय म्हणून त्यांची रवानगी CIU ब्रॅन्चमध्ये केली. तिथे त्याचे सिनियर होते इन्स्पेक्टर प्रदिप शर्मा.
ते साल होतं १९९६ चं. अंडरवर्ल्ड डॉन बबलू श्रीवास्तवचे दोन पंटर अमूक अमूक ठिकाणी येणार आहेत, अशी टिप प्रदिप शर्मांना मिळाली होती. त्याच चकमकीत दया नायकच्या पिस्तुलातून पहिल्यांदा गोळ्या सुटल्या. दोन पंटर खल्लास झाले. पण एका सब इन्स्पेक्टरला ‘एकांन्टर स्पेशालिस्ट’ बनवून गेले.
प्रदीप शर्मांना अस्सल ज्युनियर मिळाला होता. त्याला मरायची भिती वाटतं नव्हती. तो फक्त मारायच्या गोष्टी करायचां. रफीक डब्बेवाला, सादिक कालिया, श्रीकांत मामा, विनोद भटकर, परवेज सिद्दीकी आणि सुभाष एकामागून एक नाव जोडत गेलं. आत्ता दया नायक हे नाव साधं राहिलं नव्हतं. दयाच्या नावाने आत्ता मुंबईच्या क्राईमच्या दुनियेत एक दहशत जोडली गेली होती.
२६ डिसेंबर १९९६. सादिक कालिया हे नाव मुंबईच्या दहशतीमधलं सर्वात महत्वाचं नाव होतं. सादिक शार्पशूटर होता. दोन्ही हातानं एका वेगात बंदुक चालविण्यासाठी तो गुन्हेगारी जगतात प्रसिद्ध होता. २६ डिसेंबरच्या दिवशी सादिक आणि दया नायकची कुस्ती संपूर्ण दादरच्या फुल मार्केटला पहायला मिळाली होती.
दादरच्या मार्केटमधून जात असतानाच सादिक दया नायकच्या रडारवर आला. पुढचा मागचा विचार न करता भर बाजारात दया नायकने सादिकवर हात टाकला. सादिक आणि दयाची कुस्ती चालू झाली. आत्ता दया नायक भर चौकात मारला जाणार, याचा अंदाज बारक्या मुलानंदेखील लावलेला. अचानक एक गोळी आली आणि दया नायकच्या मांडीतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या.
दया नायकचं रक्त पाहून निम्मी गर्दी आपआपल्या घरी गेली होती. तोच दुसरी, तिसरी अशा एकामागून एक गोळ्या आल्या आणि सादिक आडवा झाला. दया नायकने दादरच्या गर्दीत सादिकचा ‘गेम’ केला.
दया नायकच्या नावावर ८० हून अधिक एन्कांन्टर जमा झाले होते. अशातच अंधेरी नाक्यावर त्याच्या गाडीत बॉंम्ब ठेवण्यात आला. एखाद्या सिनेमाला लाजवेल, अशा आश्चर्यकारकरितीने दया नायक यातून वाचला. महिनाभर तो हॉस्पिटलमध्ये होता.
आत्ता दया नायकला सिनेमाहून अधिक फेम (प्रसिद्धी) मिळू लागलं. संपूर्ण बॉलिवूडचं लक्ष त्याच्याकडे गेलं. खंडण्यांच्या धमक्या येण्याच्या काळात बॉलिवूडसाठी दया नायक हे नाव हिरोहून कमी नव्हतं. फेम नावाचा प्रकार दया नायकच्या नावासोबत जोडला जावू लागलां.
अशातच दया नायकने आपल्या गावात शाळा बांधण्याचा निर्णय घेतला. दिवसरात्र टेबलांवर दारुचे ग्लास भरुन शिक्षण घेतलेल्या पोराला शाळेचं महत्व कळणं साहजिकच होतं. पण याच शाळेच्या उद्घाटनानंतर त्याचे उलटे वासे फिरु लागले.
बॉलिवूड इंडस्ट्रीमधले मोठमोठे सेलिब्रिटी त्याच्या शाळेच्या उद्घाटनासाठी हजर झाले होते. दया नायक एन्कांटर स्पेशॅलिस्ट असला तरी तो एक सब इन्प्सेक्टर होता. त्याचा पगार आणि त्याची शाळा हे गणित न जुळणारं होतं. त्याच्यावर चौकशी आयोग बसवण्यात आला. पण त्यातूनही तो सहीसलामत सुटला. दया नायकच्या संपत्तीवर चर्चा करणारेही शांत झाले होते.
पण दया नायकच्या तक्रारींचा पाढा वाढतच होता. त्याच्या संपत्तीबद्दलचा संशय दरवेळी वाढवणारी उदाहरणं दिसतं होती. शेवटी ॲन्टी करप्शन ब्रॅन्चने त्याच्यावर चौकशी आयोग नेमला. २००६ साली आपल्या दोन जवळच्या मित्रांसोबतच त्याला अटक करण्यात आली. दोन महिने एन्कांटर स्पेशॅलिस्ट जेलमध्ये होता. मिडियाच्या नजरेतून हे बातमी मूल्य होतं.
दया नायक जेलमध्ये ही बातमी टिआरपी वाढवणारी होती. पण त्यामुळे दया नायकडे बघणारी नजर बदलली. त्याने केलेल्या एन्कांन्टवर संशय घेण्याचं काम घेण्याच कामदेखील करण्यात आलं. तब्बल पाच वर्षे दया नायकला सस्पेंड ठेवण्यात आलं. याच २००९ मध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासाठी परवानगी देण्याची वेळ आली, तेव्हा डिजीपी एस. एस. विर्क यांनी त्या गोष्टीला नकार दिला.
इतक्या बहादूर अधिकाऱ्याच्या विरोधात केस चालवण्यात यावी, या गोष्टीला त्यांचा विरोधच होता. २०१० साली सुप्रीम कोर्टानेदेखील त्याच्यावर असणारे आरोप बेदखल केले. तो पुन्हा नोकरीवर रुजू झाला. इतक्या काळानंतरदेखील दया नायक एक पोलिस सब इन्प्सेक्टरच होता.
२०१८ साली त्याचं प्रमोशन झालं होतं. आत्ताही तो मुंबई पोलिसमध्येच आहे. ते ही पोलीस इन्स्पेक्टर म्हणून. पण आजही त्याच्या मागावर जुना हिशोब चुकता करण्यासाठी अंडरवर्ल्ड असेलच. अशा या वादळातदेखील तो खंबीरच असतो.