लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
शनिशिंगणापूर येथील बनावट ॲपच्या माध्यमातून केलेल्या करोडो रुपयांच्या घोटाळ्याची तातडीने चौकशी करून यात सामील असणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी केली.
या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अंजुम पटेल, बसपाचे हरीश चक्रनारायण, छावा संघटनेचे रावसाहेब काळे उपस्थित होते.
या निवेदनात म्हटलं आहे, की शनैश्वर देवस्थान, शनीशिंगणापूरमध्ये काही कर्मचाऱ्यांनी देवस्थानच्या अधिकृत ॲपच्या ऐवजी बनावट ॲप तयार करून ऑनलाईन पूजेच्या माध्यमातून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे.
सदर ॲपचे दोन लाखांच्यावर सदस्य असून त्यांची सदस्यत्व फी प्रति व्यक्ती १८०० लावली आहे. तसेच इतर पूजेच्या साहित्याची वेगळीच फी लावण्यात आली आहे. अशा प्रकारे जवळ जवळ पन्नास कोटी रुपये शनिभक्तांकडून या बनावट ॲपच्या माध्यमातून जमा करण्यात आले परंतू हा निधी देवस्थान तिजोरीत जमा न होता तो बनावट ॲपच्या माध्यमातून खाजगी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाला, असा आरोप माळवदे यांनी केला आहे.
या ॲपच्या माध्यमातून करोडोंचा निधी कर्मचाऱ्यांनी हडप केला गेला आहे. यामुळे देवस्थानच्या उत्पन्नात मोठी घट झाली. देवस्थानची करोडोंची फसवणूक करण्यात आली.
सकृत दर्शनी मोठा भ्रष्टाचार यात झालेला दिसतो. ऑनलाईन पूजेच्या नावाखाली शनिभक्तांची मोठी लूट या कर्मचाऱ्यांनी केलेली दिसून येते.
सदरची रक्कम ही पन्नास कोटींच्या पुढे जात असून ही मोठी गंभीर बाब दिसून येत आहे. याअगोदर देवस्थान प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता प्रशासन यावर बोलायला तयार नव्हतं. याबाबत प्रशासनाला लेखी खुलासादेखील मागितला असून आंदोलनाचा इशारादेखील देण्यात आला आहे. दरम्यान, या संदर्भात धर्मादाय आयुक्त कार्यालयातदेखील तक्रार देणार असल्याचं माळवदे यांनी सांगितलंय.