लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (दि.११) मोठी घोषणा केली. या देवस्थानला सन 2018 चा कायदा लागू करणार, असं मुख्यमंत्री फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिशिंगणापूर येथे शनैश्वराच्या दर्शनासाठी आले असता त्यांचं घोडेगाव हेलिपॅडवर स्वागत करण्यात आलं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री शनैश्वर मूर्तीस आणि उदासी महाराज मठात अभिषेकही करण्यात आला.
यावेळी उपस्थित जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) राधाकृष्ण विखे, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार शिवाजीराव कर्डीले,
आमदार विठ्ठलराव लंघे, भाजपचे जिल्हा समन्वयक सचिन देसरडा, भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील, भैय्यासाहेब गंधे, संभाजीराजे दहातोंडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय बिरादार आदी पदाधिकारी, अधिकारी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
काय आहे 2018 चा कायदा?
शनिशिंगणापूर देवस्थानला ज्या क्षणी 2018 चा कायदा लागू होईल, त्या क्षणापासूनच या देवस्थानचं विश्वस्त मंडळ बरखास्त होईल. त्यानंतर राज्यातली कोणतीही व्यक्ती या देवस्थानच्या अध्यक्षपदी नियुक्त केली जाईल. शनिशिंगणापूर देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. दरम्यान, या देवस्थानच्या विश्वस्त मंडळाकडून ज्या काही कथित ‘गडबडी’ झाल्या आहेत, त्याची चौकशी पूर्ण झाली असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय.
शनिचरणी जमा झालेल्या दानाचा हिशोब कुठं आहे?
शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून साईचरणी जमा झालेल्या दानाबद्दल वेळोवेळी सविस्तर माहिती प्रसारित करण्यात येते. यामध्ये रोकड किती, सोन्या-चांदीचे दागिने किती, गुप्तदान किती, याविषयीची माहिती साई भक्तांना कळते. मात्र शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांकडून आतापर्यंत शनिभक्तांनी दिलेल्या दानाबद्दलची सविस्तर माहिती प्रसारित करण्यात आलेली नाही. त्यामुळे शनिभक्तांनी दिलेलं हे दान नक्की कुठं आहे, असा प्रश्न शनिभक्तांना पडला आहे.