लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
‘जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर हे नेवासे तालुक्यातल्या शनी भक्तांसह तमाम महाराष्ट्र आणि देशभरातल्या शनी भक्तांचं अढळ श्रद्धास्थान आहे. देशभरातले अनेक शनी भक्त या देवस्थानला गुप्तदान करत असतात. परंतु या सर्व शनी भक्तांच्या भावनेचा आणि त्यांनी केलेल्या दानाचा घोर अपमान करण्याचं पाप या देवस्थानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. या संदर्भात आमच्या मित्र पक्षाचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील आणि काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत. या देवस्थानमध्ये नोकरी करत असलेल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बनावट ॲप तयार करुन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केलेला आहे. ही अतिशय निंदनीय बाब आहे. यामध्ये जे जे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी असतील आणि पुराव्यानिशी ते जेव्हा सिद्ध होईल, त्यानंतर सर्वच संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी प्रतिक्रिया स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठल लंघे
यांनी लोकपत डिजिटल मीडियाशी त्यांच्या मोबाईलवरुन बोलताना व्यक्त केलीय.
आमदार लंघे म्हणाले, ‘ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या देवस्थानचा कारभार चालतो, ते या घोटाळ्यापासून अनभिज्ञ कसे आहेत, हाच मोठा प्रश्न आहे. सुदैवानं या घोटाळ्याच्या संदर्भात पोलीस प्रशासनासह धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्यामुळे हा विषय अत्यंत गंभीर बनला आहे. राज्याच्या विधानसभेत या विषयाचे पडसाद नक्कीच उमटतील. शनिभक्तांनी दिलेल्या दानाचा अपमान करत असताना ते सारे कोट्यवधी रुपये नक्की कोणाच्या खिशात गेले, या घोटाळ्याला कोणाचा वरदहस्त आहे आणि या घोटाळ्यात कोण कोण सहभागी आहेत, हे या तालुक्यातल्या शनीभक्तांना चांगलंच ठाऊक आहे. शनि भक्तांच्या श्रद्धेची अशाप्रकारे थट्टा करणाऱ्यांना शनिदेव कधीच माफ करणार नाही. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे, खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं या घोटाळ्याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत’.
स्व. बाबुराव बानकर यांच्या स्वप्नांना दिली गेली मूठमाती…!
शनिशिंगणापूर देवस्थानचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय बाबुराव बानकर, महंत उदासी महाराज, स्व. भाऊसाहेब शेटे पाटील आणि त्यावेळच्या विश्वस्त मंडळाने हे देवस्थान उदयास आणण्यासाठी अथक परिश्रम केले. स्वर्गीय बाबुराव बानकर यांनी जागेअभावी या देवस्थानचं कार्यालय त्यांच्या राहत्या घरात केलं होतं. परंतु एका नव्या पैशाचीदेखील अपरातफर त्यावेळी करण्यात आली नाही. शनिभक्तांच्या भावनांचा नितांत आदर करत स्वर्गीय बानकर यांनी या देवस्थानची भरभराट कशी होईल, या देवस्थानशी जगभरातले शनिभक्त कसे जोडले जातील, हे स्वप्न पाहिलं होतं. परंतु स्वर्गीय बानकर यांच्या त्या स्वप्नांना आजच्या काळात मूठमाती देण्यात आली, ही प्रचंड संतापजनक बाब आहे.
धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या भूमिकेची शनिभक्तांना प्रतिक्षा…!
शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये बनावट ॲप घोटाळ्यासह अनेक प्रकारचे आर्थिक घोटाळे करण्यात आले असल्याची दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळत आहे. बर्फी घोटाळा, तेल घोटाळा, देवस्थानच्या प्रसादालयातला घोटाळा, देवस्थानच्या लॉजिंग आणि गेस्ट हाऊसमधला घोटाळा असे अनेक घोटाळे या देवस्थानमध्ये सुरु असल्याचं बोललं जात असलं तरी या संदर्भात अद्यापपर्यंत एक दोघांव्यतिरिक्त कोणीही आवाज उठविलेला नाही. दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या बनावट ॲप घोटाळ्यासंदर्भात धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारींसंदर्भात धर्मदाय आयुक्त कार्यालय नक्की कोणती भूमिका घेणार, याकडे शनीभक्तांचं लक्ष लागलं आहे.
डॉ. वैभव शेटे पाटील यांचं एसपी सोमनाथ घार्गे यांना निवेदन…!
शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये करण्यात आलेल्या बनावट ॲप घोटाळ्यासदर्भात या देवस्थानचे माजी विश्वस्त डॉक्टर वैभव शेटे पाटील यांनी एसपी सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन नुकतंच (दि. ३) निवेदन दिलं. त्याचबरोबर डॉ. शेटे पाटील यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयातदेखील या संदर्भात निवेदन दिलं आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी करुन संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. शेटे पाटील यांनी केली आहे.
‘तो’ अर्ज आला ‘सायबर’कडे…!
शनिशिंगणापूर बनावट ॲप घोटाळ्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी अहिल्यानगरचे एसपी सोमनाथ घार्गे यांना तीन दिवसांपूर्वी (दि. २) एक निवेदन दिलं होतं. या घोटाळ्यात जे कोणी सहभागी आहेत, त्यांच्याविरुद्ध लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी माळवदे यांनी या निवेदनानुसार केलीय. दरम्यान, माळवदे यांचा हा अर्ज एसपी घार्गे यांनी नुकताच सायबर विभागाकडे पाठविला असल्याची माहिती या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलीय. त्या अर्जाची चौकशी सुरु करण्यात आली असून एस.पी. घार्गे यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील तपास करण्यात येणार असून दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.