लोकपत न्यूज नेटवर्क / शिर्डी
महाराष्ट्राच्या जनतेने घराणेशाहीचं राजकारण करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं असून अशा लोकांना या राज्यात जनतेनं नाकारलं आहे. महाराष्ट्र भाजपाच्या या विजयाने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं विश्वासघाताचं राजकारण या राज्यातल्या जनतेनं वीस फूट खोल जमिनीत गाडून टाकलंय, असं वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री अमित शहा
यांनी केलं.
शिर्डीत आज (दि. १२) झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मिळविलेल्या दणदणीत विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी कौतूक केलं. ते म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हीच खरी राष्ट्रवादी आहे.
शरद पवार यांनी दगाफटक्याचं राजकारण केलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचं राजकारण केलं. तर सनातन संस्कृतीचा प्रवाह पुढे नेण्याचं केलेलं काम या महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं. देशात किंवा तत्त्वांचे राजकारण चालेल, असा निर्धार महाराष्ट्रातल्या जनतेने केला आहे’.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अधिवेशनात भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, ‘विरोधकांनी पसरविलेल्या खोट्या ‘नरेटिव्ह’पासून सावधानता बाळगा. ज्या पद्धतीने विधानसभेत तुम्ही घवघवीत यश मिळवलं, त्याच पद्धतीनं आणि त्याच जोमानं आगामी दोन-तीन महिन्यानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतदेखील असंच घवघवीत यश मिळविण्याचा तुम्ही सर्वांनी निर्धार करावा. साईबाबांच्या ‘श्रद्धा आणि सबुरी’ या मूलमंत्राचा विसर पडू देऊ नका’.