संपादकीय…!
20 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक शांततेत पार पडली. मतदानाची टक्केवारीदेखील जेमतेम राहिली. मतदानाची ही टक्केवारी पाहिली असता अनेक जण कसल्याही प्रकारचे अंदाज व्यक्त करत आहेत. अर्थात हा त्यांचा अधिकार असला तरी अंदाज हा अंदाजच असतो. कारण तो कधी कधी खरा ठरतो तर कधी कधी खोटादेखील ठरतो. असो, उद्या अर्थात दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्याचबरोबर अनेक उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचाही ‘निकाल लागणार’ आहे. त्यामुळे या सर्वांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मित्रत्वाचा एकच सल्ला देत आहोत, की नेते आणि कार्यकर्त्यांनो, उद्याचा दिवस जरा सबुरीनंच घ्या.
कुठलीही निवडणूक म्हटलं की कोणाचा तरी विजय आणि कोणाचा तरी पराजय हा ठरलेलाच असतो. ज्यांचा विजय होतो, त्यांचे कार्यकर्ते आनंदानं गुलाल उधळत असतात तर ज्यांचा पराजय होतो, त्यांचे कार्यकर्ते मात्र हिरमुसलेले असतात. विजयी होणाऱ्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून पराभूत होणाऱ्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक गुलालाची उधळण करत टक्केटोणप्यांचीसुद्धा बरसात केली जाते. यामुळे कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते.
जे विजयी झालेले असतात, त्यांची कारकिर्द फक्त पाच वर्षांसाठीच असते. या पाच वर्षांच्या कारकिर्दीमध्ये ते काय दिवे लावतात, हे आपण यापूर्वी पाहिलेलेच आहे. सत्तेचा गैरवापर कसा करतात, जनतेला पायाभूत सुविधा देण्याऐवजी जनतेतल्याच काही विरोधकांचे पाय तोडण्याचं काम कशा पद्धतीने केलं जातं, खोटे नाटे आरोप करत खोट्या गुन्ह्यांमध्ये विरोधकांना कशा पद्धतीनं गोवलं जातं, हे तुम्ही आम्ही चांगल्या पद्धतीनं अनुभवलेलं आहे. त्यामुळेच उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उद्याचा दिवस जरा सबुरीनंच घ्यावा, असा या सर्वांना आमचा मित्रत्वाचा सल्ला आहे.
… पण काहीही झालं तरी अन्याय अजिबात सहन करु नका…!
मित्रांनो, उद्याच्या निकालानंतर आणि सरकार स्थापन झाल्यानंतर विजयी झालेल्या किंबहुना संभाव्य आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्यांवर दहशत माजविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. वेळप्रसंगी अनेकांना मारहाणदेखील केली जाऊ शकते. निवडणुकीत विरोधात काम केलं म्हणून अनेकांना त्रास दिला जाऊ शकतो. परंतु हा सर्व त्रास मुकाट्यानं सहन करु नका. विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
म्हणतात, ‘अन्याय करणाऱ्यांइतकाच अन्याय सहन करणारासुद्धा गुन्हेगार आहे’. हे नक्की लक्षात ठेवा. संभाव्य आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सत्तेचा माज दाखवत तुम्हाला जी जी मंडळी त्रास देतील, त्यांच्याविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यापासून एस.पी. ऑफिस, आयजी ऑफिस, राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, राज्यपाल, पंतप्रधान, राष्ट्रपती थेट या सर्वांच्यापर्यंत संबंधितांविरुद्ध तक्रारी करा. त्यासाठी आमची (लोकपत न्युज नेटवर्क अहिल्यानगर) मदत लागली तर आम्हाला कधीही (70 28 35 17 47) संपर्क करा. पण अजिबात अन्याय सहन करु नका. धन्यवाद.