लोकपत न्युज नेटवर्क / मंत्रालय प्रतिनिधी / मुंबई
सत्ताधारी संविधान बदलणार, असा खोटा ‘नरेटिव्ह’ ‘सेट’ करणाऱ्या विरोधकांना ‘जोर का झटका’ देण्यासाठी येत्या ६ डिसेंबर रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाचं औचित्य साधून देवेंद्र गंगाधर फडणवीस
हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे याप्रसंगी बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान
समोर ठेवून शपथ घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
दरम्यान, काल (दि. २८) रात्री राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेच्या घडामोडींना चांगलाच वेग आला.
विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी गृह आणि नगर विकास खात्यासह इतर महत्त्वाच्या खात्यांवर दावा सांगितला आहे. मात्र शिंदे यांच्या शिवसेनेला उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम आणि महसूल खातं दिलं जाणार आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थ खातं दिलं जाणार आहे.
भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत गृहमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु असल्याच्या बातम्या अद्यापही सुरुच आहेत. दोन्हीही पक्षांकडून गृहमंत्री पदाची मागणी करण्यात येत आहे. भाजपला मुख्यमंत्रीपदासह गृहमंत्रीपद मिळावं, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.