संपादकीय…!
हल्लीच्या सण – उत्सवात एक प्रकारची बेजबाबदार वृत्ती सर्रासपणे पहायला मिळत आहे. चायना मांजावर बंदी घालण्यात यावी, अशा प्रकारच्या बातम्या दरवर्षी येतात. पण शासन, प्रशासन आणि तुम्ही आम्ही या बातम्या फक्त वाचतोच. प्रत्यक्षात या बातम्यांतून काही तरी शिकण्याची आवश्यकता असते. मात्र शिकण्याऐवजी सण – उत्सवात तुम्ही आम्ही केवळ आनंद शोधत असतो. हा आनंद शोधत असताना अनेक वेळा काहींचा आततायीपणाच जास्त प्रमाणात दिसून येतो. दुर्दैवानं सण – उत्सवातला हा आततायीपणाच तुमच्या आमच्यासाठी फक्त आणि फक्त घातकच ठरतोय.
काल (दि. १४) पार पडलेला महिला वर्गासाठीचा मकर संक्रांतीचा सण हा अनेकांच्या मृत्युला कारणीभूत ठरला. या सणाला पतंग उडविण्याचं ‘खूळ’ कधी, कोणत्या ‘दिड शहाण्या’च्या डोक्यात आलं, माहित नाही. पण या सणाला काल पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर सर्रासपणे केला गेला. परिणामी कालच्या मकर संक्रांतीला अनेक जण ठार झाले, अनेक जखमी झाले. मुक्या प्राण्यांसह पक्षांच्याही जिविताला या नायलॉन मांजामुळे मनस्ताप सहन करावा लागला.
हे कुठं तरी थांबायला हवंय, यासाठी नक्की कोणी पुढाकार घ्यायचा, भविष्यात आणखी किती जणांचा या सण – उत्सवात मृत्यू होईल, या प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नाहीत. शिवजयंतीची मिरवणूक, गणेश विसर्जन मिरवणूक आदी उत्सवांसह लग्न समारंभात हल्ली सर्रासपणे डीजे लावला जातो. अर्थात डीजे हे मंगल वाद्यं नसून रण वाद्य आहे. पण हे दुर्दैवानं कोणाच्याच लक्षात यायला तयार नाही. लग्नात डीजेचा वापर ही तरुणाईसह त्यांच्या पालकांच्या श्रीमंतीचा ‘माज’ असतो. हा ‘माज’ उतरविण्यासाठी खरं तर पोलिसांनी तक्रारीची अजिबात वाट पाहू नये.
राष्ट्रपुरुषांच्या जयंती मिरवणुकीसह लग्न समारंभात डीजेच्या वापरावर यापुढे निर्बंध घालण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि पोलीस यंत्रणेनं कोणाचीही भीडभाड न ठेवता संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. कारण डीजेमुळे कानांवर विपरित परिणाम होतो. हृदयावर ताण येतो. परिणामी अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यासाठी पालक आणि पोलिसांनी यापुढे कठोर पावलं उचलण्याची नितांत आवश्यकता आहे.