लोकपत न्यूज नेटवर्क / बीड
बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मीक कराड आणि पोलिसांची बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाल्याचा गंभीर आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलंच तापलं आहे. आज (दि. १३) सरपंच देशमुख यांचे बंधूं धनंजय देशमुख आणि संतप्त ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. या आंदोलनाची दखल बीडच्या पुढील यंत्रणेने घेतली असल्यास बीडच्या पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर बीडचे खासदार सोनवणे यांनी वाल्मीक कराड, पोलीस आणि मंत्री मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
खासदार सोनवणे यांनी जो आरोप केला आहे, तोच आरोप यापूर्वी आमदार सुरेश धस यांनी केला आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्या आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मंत्री मुंडे यांच्या बंगल्यावर वाल्मीक कराड आणि पोलिसांची बैठक झाल्याचं आमदार धस यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे. या प्रकरणात खासदार सोनवणे यांनी मंत्री मुंडे यांचे थेट नाव घेऊन गंभीर आरोप केले आहेत.
खासदार सोनवणे म्हणाले, ‘माझ्या पहिल्याच बाईटमध्ये मी मीडियाला म्हटलं होतं, की तिसऱ्या आरोपीच्या ‘कनेक्शन’ धाराशिव मार्गे पुण्याला लागते का ते बघा. कारण माझ्या बोलण्यामागे काही ‘लॉजिक’ होतं. आज हा आरोपी धाराशिव मार्गे पुण्याला गेल्याचं समोर आलं. वाल्मीक कराड ज्या दिवशी सीआयडी पोलिसांना शरण आला, त्याच दिवशी एसआयटीची समिती गठीत करण्यात आली’. वाल्मीक कराडच्या मनाप्रमाणे सरपंच देशमुख हत्याकांडाचा तपास सुरू आहे, असं देखील खासदार सोनवणे म्हणाले.