लोकपत न्यूज नेटवर्क / बीड
आवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि त्या खंडणीला विरोध करणारे बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख
यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्याकांडाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. बीड पोलिसांनी या हत्याकांडासंदर्भात न्यायालयात दोषारोप पत्र सादर केलं आहे. यामध्ये वाल्मीक कराड याचा एक नंबरचा आरोपी असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या दोषारोपाद्वारे वाल्मीक कराड
हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागचा ‘मास्टर माईंड’ असल्याचं स्पष्ट झालं आहे.
सरपंच देशमुख हत्याकांडामध्ये खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या असे गुन्हे आहेत. पाच साक्षीदारांच्या एकत्रित जबाबानंतर बीडच्या पोलिसांना वाल्मीक कराडविरुद्ध पुरावे मिळाले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांना जी मारहाण करण्यात आली, त्या मारहाणीचा व्हिडिओदेखील सीआयडी पोलिसांकडे आहे.
दरम्यान, मयत देशमुख हत्याकांडामध्ये दोन नंबरचा आरोपी विष्णू चाटे हा आहे. 6 एप्रिल रोजी संतोष देशमुख, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांच्यामध्ये आवादा कंपनीच्या परिसरात वाद झाला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर 7 एप्रिलला सुदर्शन घुले याने वाल्मीक कराडला फोन केला होता. ‘जो आपल्या आड येईल, त्याला सोडायचं नाही, असं वाल्मीक कराडने सुदर्शन घुलेला सांगितलं होतं.
सुदर्शन घुलेच्या फोनवरुन वाल्मीक कराडने दिनांक 29 नोव्हेंबर रोजी आवादा कंपनीला खंडणी मागितली होती. 6 डिसेंबर रोजी देशमुख, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे यांच्यात वाद झाल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे. बीड शहरात वाल्मीक कराडची दहशत असल्याचंही आरोपपत्रात म्हटलं आहे.
कृष्णा आंधळे अद्यापही फरारच…!
सरपंच देशमुख हत्याकांडामध्ये आतापर्यंत वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, सिद्धार्थ सोनवणे हे आरोपी अटक करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या हत्याकांडाचा ‘मास्टर माईंड’ असलेला वाल्मीक कराड हादेखील अटकेत असताना या गुन्ह्यातला एकमेव कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरारच आहे.