लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
राज्यातल्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटून गेले. तरीदेखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही ‘एफ आर पी’ची रक्कम वर्ग करण्यात आलेली नाही. त्यामुळे एफ आर पी कधी मिळणार, असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
यावर्षी ऊसाला कोणता कारखाना किती भाव देणार, याचं उत्तर मोजके कारखाने वगळता कोणीही दिलेलं नाही. अशा परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा वाली कोण, या शेतकऱ्यांच्या घामाच्या कष्टाला काहीच किंमत नाही का, राज्य सरकारचं सहकार खातं आणि संबंधित मंत्री झोपलेत की जागे आहेत, असादेखील प्रश्न संतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून विचारला जातोय.
रात्रंदिवस कष्ट करायचे, पोटच्या पोराप्रमाणे ऊसाच्या पिकासाठी मेहनत करायची, कर्ज काढून खतं विकत घ्यायची आणि जीवावर उदार होऊन ऊसाचं जोमदार पीक आणण्यासाठी काबाडकष्ट करायचे, एवढेच उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात राहिलं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणारी संघटना कुठं गेली आहे? ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज नक्की कोणामुळे दाबला जातोय, याकडे खरं तर राज्य सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.