संपादकीय…!
‘झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए’, असं नेहमी म्हटलं जातं, यात काहीच चूक नाही. कारण आज काल ठिकठिकाणी अशा घटना घडत आहेत. पैशांपुढे भूतं नाचतात, तुम्ही आम्ही तर शेवटी माणसं आहोत. हल्ली पैशांसाठी माणसं काहीही करायला तयार होताहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी एक बातमी आली. साताऱ्यामध्ये पैशांचा पाऊस पडला म्हणे…!
तिथला एक कोण तरी मांत्रिक आहे. त्या मांत्रिकाने साताऱ्यातल्या एका घरी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पूजा करायचं ठरवलं. अर्थात साताऱ्यातल्याच अनेकांची त्यासाठी संमती होती. ठरल्याप्रमाणे पूजा सुरू झाली. तत्पूर्वी पैशांचा पाऊस पाडण्याच्या पूजेसाठी त्या मांत्रिकाने संबंधित कुटुंबियांकडून आधीच 26 लाख रुपये रोज घेतले होते. बराच वेळ ही पूजा सुरु होती. त्या कुटुंबातल्या लोकांना असं वाटलं, की आता आपल्याला कोट्यवधी रुपये मिळतील, आपण श्रीमंत होऊ.
संबंधित मांत्रिकाने पैशांचा पाऊस थोड्याच वेळात पडेल असं सांगून याविषयी कोणाला काही सांगू नका, अशी तंबी दिली. काही वेळाने पूजा संपन्न झाली, हेतू साध्य झाला, असं सांगत एका मोठ्या बॉक्समध्ये 30 तीस लाख रुपये असल्याचं त्या मांत्रिकानं संबंधित कुटुंबातल्या लोकांना सांगितलं. मात्र हा बॉक्स 21 दिवस उघडायचा नाही, असा आदेश देऊन तो मांत्रिक तिथून निघून गेला. बरोब्बर 21 दिवसांनी संबंधित कुटुंबियांनी तो बॉक्स उघडला असता त्यामध्ये कागदांची रद्दी आढळून आली.
नुकतंच भारताचं चांद्रयान यशस्वीरित्या चंद्रावर उतरल्याच्या बातम्या आल्या होत्या. आपला देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे. वेगवेगळे शोध लावले जात आहेत. विज्ञानाच्या क्षेत्रात चांगल्यापैकी प्रगती सुरू आहे. अशा परिस्थितीतदेखील आपल्या देशातले विशेषतः महाराष्ट्रातले लोक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत आहेत, हे मोठं दुर्दैवी आहे. लोभ, इच्छा, स्वार्थ यामुळे अशा घटना घडत आहेत.
लोभी, स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांना आपल्या संतांनी कितीही मार्गदर्शन केलं, तरी ते असल्या प्रकाराला भुलतातच. अनेक मोठमोठे अधिकारी सध्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्याविषयी मार्गदर्शन करत आहेत. मात्र तरीदेखील अनेक भामटे सामान्य लोकांना ऑनलाईन गंडा घालत आहेत. हे कुठं थांबणार, याविषयी आणखी कोणकोणत्या प्रबोधनाची आवश्यकता आहे, लोक इतके लोभी का होताहेत, याचा जर विचार गंभीरपणे केला गेला नाही तर भविष्यात अनेक ठिकाणी पैशांचा पाऊस पाडणारा बाबा तयार झाल्याशिवाय राहणार नाही. तूर्तास इतकंच. धन्यवाद.