लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
महाराष्ट्रानं देशाला विकासाची दिशा दिली आहे, असं आतापर्यंत छाती बडवू बडवू सांगितलं जायचं. पण हाच महाराष्ट्र कर्जाच्या खाईत ढकलला गेला, याबद्दल कोणीच चकार शब्द करायला तयार नाही. महाराष्ट्रावर तब्बल नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज झालं आहे. मात्र राज्याच्या कारभाऱ्यांनी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याच्या मंत्रीमंडळानं अर्थसंकल्पामध्ये ‘लाडकी बहीण योजने’साठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
हे करत असताना या राज्यातल्या जनतेला मूलभूत सुविधा रस्ते, पाणी, वीज हे देण्यासाठी महाराष्ट्राच्या तिजोरीत सध्या किती रुपये शिल्लक आहेत? शिल्लक तर बाजूलाच राहिले, पण महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये मागील पाच वर्षांत केलेल्या कामांच्या मोबदल्यात जी देणी थकली आहेत, तो आकडा तब्बल 75 हजार कोटी रुपयांचा आहे. यामध्ये एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातलेच 15 हजार कोटी थकले आहेत.
एकीकडे, महाराष्ट्रावर झालेलं कर्ज तर दुसरीकडे थकीत देणे 75 हजार कोटी. अशा विचित्र परिस्थितीत महाराष्ट्राच्या विकासाचा अनुशेष राज्याचे कारभारी कसा भरुन काढणार, हाच मोठा प्रश्न आहे. यासाठी एक तर राज्याच्या पुढाऱ्यांना कुठून तरी 2 लाख कोटी रुपये कर्ज काढावे लागणार आहे. किंवा केंद्र सरकारकडे हात पसरावे लागणार आहेत. यासंदर्भात ‘लोकपत’ यूट्यूब चॅनलनं प्रेक्षकांशी केलेली ही हितगुज नक्की पहा.