लोकपत न्यूज नेटवर्क / नागपूर / विधीमंडळ प्रतिनिधी
घराचं अंगण आणि एकूणच घराचं रूपडं पाहून त्या घराच्या मालकाच्या श्रीमंतीचा अंदाज लावला जातो. सरपंच संतोष देशमुख यांचे हाल हाल करून त्यांना ठार मारण्यात ज्याचा समावेश आहे, त्या सुदर्शन घुलेचं घर फक्त सहा पत्रांचं आहे. याचाच अर्थ तो करोडपती नक्कीच नाही. पण मग त्याच्याकडे लाखो रुपये किंमतीची स्कॉर्पिओ कशी आली? तो स्कॉर्पिओतून फिरतोच कसा, अशा प्रकारचा जळजळीत सवाल बीडचे आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केलाय.
नागपूर इथं सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख
यांच्या हत्येचा सविस्तर असा उलगडा त्यांच्या भाषणात केला.
ते म्हणाले, ‘तीन वेळा आमदार होणं सोपं आहे. पण तीन वेळा गावचा सरपंच होणं खूप कठीण आहे. संतोष देशमुख हा समाजाभिमुख आणि लोकाभिमुख काम करणारा युवक कार्यकर्ता होता. मात्र लायटरनं त्यांचे डोळे जाळण्यात आले. त्यांच्या छातीवर उड्या मारण्यात आल्या.
या हत्याकांडात सहभागी असलेल्या सुदर्शन घुले याला स्कॉर्पिओ कार नक्की कोणी भेट दिली? या हत्याकांडामागचा ‘आका’ कोण आहे, ‘आका’ पोलिसांच्या रेकॉर्डवर येणार का, खरं तर त्याचा शोध घेण्याची अत्यंत गरज आहे’.
दरम्यान, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकत्कायाच काही दिवसांपूर्वी (दि. १२) स्वतःची भूमिका स्पष्ट करत हे खूप गंभीर प्रकरण असून यामध्ये राजकारण आणू नये, अशी हात जोडून विनंती त्यांनी केली होती. असं असताना आमदार सुरेश धस यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातला तो ‘आका’ कोण, तो ‘आका’ पोलिसांच्या रडारवर कधी येईल, पोलीस त्याच्या मुसक्या आवळतील का, या सर्व प्रश्नांची उत्तर अद्याप तरी गुलदस्त्यातच आहेत.