Wednesday, January 22, 2025

सूज्ञ वाचकांनो! हे जर तुम्ही वाचलं नाही तर तर तुम्ही काहीच वाचलं नाही असं म्हणावं लागेल…! नक्की वाचा…! यशवंतरावांचं बोट महाराष्ट्रानं सोडले म्हणून….!

लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

महाराष्ट्राच्या लक्षात असेल का? बहुधा नसेलच. सोमवार, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांची ४० वी पुण्यतिथी आहे. ज्यांनी या महाराष्ट्राच्या ‘बांधणी’ची सुरुवात केली. त्यांना महाराष्ट्र तर विसरलाच… त्यांच्या विचाराचे बोट धरून चाललेला महाराष्ट्र आज कुठेच दिसत नाही. त्यांचा विचारही कुठे दिसत नाही… महाराष्ट्राला त्या विचारांची आज गरज नाही, अशा अवस्थेत आपण आहोत. कारण निवडणुकीने हे सिद्ध केले आहे… पैशांचा खेळ ज्याला प्रभावीपणे करता येतो तो निवडणूक जिंकू शकतो…. लढवू शकतो… राज्य करू शकतो.

यशवंरावांच्या पहिल्या निवडणुकीचा खर्च त्यांनी लिहून ठेवला होता… तो खर्च होता १५६० रुपये एवढा ‘प्रचंड’ होता… आता विधानसभा निवडणूक ५० कोटींच्या पुढे आहे… लोकसभा निवडणुकीत तर पोत्याने पैसे वाटले गेले. परवाच्या विधानसभा निवडणुकीतही काय धुमाकूळ झाला, ते आपण पाहिलेच…. भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसावर किती कोटी रुपये वाटल्याचे आरोप झालेत… ते आरोप फेटाळले गेले… पण तावडे यांच्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्याचे नाव यात का यावे? चांगली-चांगली माणसे सुद्धा राजकारणाने नासवली का? त्यामुळे यशवंतरावांच्या ४० व्या पुण्यतिथीदिनी मस्तक बधीर होण्याची वेळ आलीय…. आज राजकीय फोडाफोडी…. त्याच्याकरिता पैशांचा वापर…. निवडणुकीतील पैसा… याच्याबद्दल लाज, लज्जा… शरम वाटावी, असे आता काही राहिले नाही… पैसा वाटणाऱ्याला नाही… पैसा घेणाऱ्यालाही नाही… बातम्या छापणाऱ्यालाही नाही… वाचणाऱ्यालाही नाही.

या सगळ्या दृष्टचक्रात महाराष्ट्र असा काही गुरफटला आहे…. की, राज्य कोणाच्या हातात चाललेय, याचा विचार करण्याची महाराष्ट्राची राजकीय कुवत संपली. अशाच निष्कर्षाला आता यावे लागेल.

यशवंतरावांच्या पुण्यतिथी दिनी काय आठवायचे आणि काय सांगायचे..? १९५७ सालच्या निवडणुकीत अटीतटीचे सामने झाले…. खुद्द यशवंतराव हे जेमतेम १००० मतांनी निवडून आले. केशवराव पवार पडले. द्विभाषिक राज्य होते म्हणून गुजरातच्या आमदारांच्या संख्याबळावर यशवंतराव मुख्यमंत्री होऊ शकले. पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये फक्त ९ आमदारांचे मताधिक्य होते. पण, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर अाणि १९६२ सालापर्यंत आणि नंतरची दोन वर्षे यशवंतरावांचे ९ मताधिक्याचे सरकार शांतपणे चालले. विरोधी पक्षनेते उद्धवराव पाटील यांनी स्पष्टपणे सांगून टाकले की, ‘आम्हाला आमदार फोडून सरकार बनवायचे नाही… मतदारांनी आम्हाला विरोधी बाकावर बसायला निर्णय दिलेला आहे…’ कुठे त्यावेळचे राज्यकर्ते…. कुठे त्यावेळचे विरोधी पक्षनेते… विरोधी बाकावरील नेते… आणि आताचे राज्यकर्ते, विरोधी पक्षनेते! एकूणच सगळा प्रकार खरेदी-विक्रीचा होऊन बसलेला आहे… २०२४ च्या निवडणुकीत बहुमत मिळाले नाही तर पुन्हा खरेदी-विक्रीचा व्यवहार होणारच.

महाराष्ट्र तो निमुटपणे पाहणार… यापूर्वी फाटा-फूट झाली नव्हती, असे नाही… पक्ष बदलले गेले नाही, असेही नाही… पण त्यात भामटेगिरी नव्हती. पैशांचा व्यवहार नव्हता… त्यावेळच्या निवडणुकांमध्ये फार सुसंस्कृतपणा होता. मला आठवणाऱ्या निवडणुका आता अशा आहेत की, कार्यकर्ते दुधात भिजवलेल्या दशम्या घेऊन, घरातील छकडा झुंपून प्रचाराला बाहेर पडायचे… आता नेत्यांच्या सवयी बिघडल्या… कार्यकर्ते त्याहून बिघडले. पूर्वीच्या आमदारांना एस. टी. मध्ये पहिल्या बाकावरील दोन जागा कायम राखीव होत्या. आणि सामान्य प्रवाशांसोबत आमदारही प्रवास करायचा. त्यावेळचे आमदार ‘आमदार निवासात’ रहायचे… आताचे ९० टक्के आमदार नागपूर अधिवेशनात आमदार निवासात राहात नाहीत. फाईव्ह स्टार, सेव्हन स्टार हाॅटेलमध्ये राहतात. त्या प्रत्येकाच्या गाड्या म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षाच्या गाडीसारख्या… सगळेच काही विचित्र… न समजणारे… मतदाराचे ५ वर्षातील उत्पन्न किती वाढले, कसे वाढले?

२०१४ ला जो आमदार उभा राहिला त्याचे २०१९ चे उत्पन्न बघा…. आणि २०२४ च्या उमेदवाराचे उप्तन्न बघा… १०० पटीने फरक झाला आहे. सामान्य मतदार हे विचारतच नाहीत की, ‘हे एवढे पैसे आणि इस्टेट कशी झाली… कुठून मिळवलेत….? महाराष्ट्रात सगळ्यात वाईट काय घडत असेल तर या सगळ्या सडलेल्या राजकीय प्रवृत्तीबरोबर महाराष्ट्राचे प्रशासनही फार मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले दिसते. यशवंतरवांसारख्यांना त्याच्या झिणझिण्या जाणवत अधिक जाणवत असतील…. किती साधी आणि कार्यक्षम व्यक्तिमत्त्वे हाेती प्रशासनात. आज तो दरारा, तो आवाका राहिलेला दिसत नाही. उलट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे पी. ए.ही निवडणुकीत उतरले आहेत. आणि राज्याच्या पोलीस महासंचालकाला काही आरोपांमुळे पदावरुन  हटवण्याची वेळ प्रशासनावर आली. एवढा प्रशासनाचा स्तर महाराष्ट्रात यापूर्वी कधी घसरला होता का?

राजकीय नेत्यांच्या वखवखलेपणाबरोबर प्रशासनालासुद्धा वाळवीने पोखरल्यासारखे वाटत आहे. अशा या सगळ्या स्थितीत ४० वर्षांपूर्वी महाराष्ट्राची ‘राजकीय आणि सामाजिक-सांस्कृतिक’ घडी बसवण्याचा प्रयत्न केला. ते सगळे आठवले की, तो महाराष्ट्र काही वेगळाच होता…., असे सतत जाणवते.
१०६१ साली यशवंतरावांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे महाबळेश्वरला ३ दिवसांवचे शिबीर घेतले. कार्यकर्ता तयार व्हायला १० वर्षे काम करावे लागते. तीन दिवसांत कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक तयार झालेली मला त्या शिबबिरात पाहता आली. यशवंतराव चव्हाण, वि. स. पागे, बाळासाहेब भारदे, विनायकराव पाटील, वसंतदादा या मंडळींनी कार्यकर्ता कसा घडतो, याचे वस्तुपाठ दिले. यशवंतरावांच्या भाषणात ‘कृषी-औद्योगिक क्रांतिचा’ संकल्प जाहीर झाला. मुंबई -पुण्याचे उद्योग ग्रामीण भागात उभे करण्याचा निर्णय झाला. आज आपण ‘एम. आय. डी. सी…’ म्हणतो त्याचा जन्म १९६१ सालचा आहे. ग्रामीण भागात लाखो रोजगार त्या विचारांतून निर्माण झाले. ‘कुरुकुंभ’, ‘लोटे परशुराम’, ‘धाटाव’, ‘बुटीबोरी’ अशा या आजच्या बहरलेल्या औद्योगिक वसाहती त्यांची संख्या आता शेकडोत आहेत. तो यशवंतरावांचा िवचार होता.

‘पंचायत-राज’ हा यशवंतरावांचा विचार होता. ‘माझा ग्रामीण कार्यकर्ता ‘नेता’ झाला पाहिजे, तो पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला पाहिजे’ हा विचार ६४ वर्षांपूर्वी मांडला गेला. आणि अंमलात आलाय… कधी? तर १९६१ च्या िशबिरानंतर…. १३ मार्च १९६२ ला देशातील पहिला जिल्हा परिषदेचा ग्रामीण भागातील अध्यक्ष महाराष्ट्रात पहिल्यांदचा खुर्चीवर बसला. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला भावाची हमी त्या काळात दिली गेली. कृषी उप्पत्न बाजार समित्या झाल्या. सहकारी उद्योग, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, ग्रामीण भागात मोफत शिक्षण…. एक नव्हे असंख्य बाजूंनी यशवंतरावांनी महाराष्ट्राची बांधणी करायला सुरुवात केली. खाजगी गाड्यांचे राष्ट्रीयकरण झाले…. खेड्यापाड्यांत एस.टी. धावू लागली. ग्रामीण भागातील सर्व जातींची मुले शाळांमध्ये जाऊ लागली…. शिकू लागली…. तिकडे कर्मवीर भाऊरावांनी ‘रयत’नावाने शिक्षणसंस्था उभी केली. पाच लाख विद्यार्थी आज त्या संस्थेत शिकत आहेत… १५०० प्राध्यापक आहेत. त्या संस्थेचे अध्यक्ष यशवंतराव होते. आज शरद पवार आहेत.

महाराष्ट्राच्या चौफेर बांधणीचा तो काळ होता. नंतरचे वसंतराव नाईक, वसंतदादा, बाळासाहेब देसाई, राजारामबापू, शरद पवार…. अगदी विलासरावपर्यंत…. नेतृत्त्वाने कर्तृत्वाची साक्ष दिली.

यशवंतरावांच्या आवाक्याची तर कल्पनाच करता येणार नाही. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याबरोबरच एकीकडे कृषी औद्योगिक क्रांती…. दुसरीकडे साहित्य संस्स्कृती मंडळ…. राज्याच्या मुख्यमंत्र्याचे ‘सांस्कृतिक भान’ किती उंच असू शकते, त्याचा तो सगळ्यात मोठा निर्णय होता. तर्कतीर्थ लक्ष्मशास्त्रींसारखा विद्वान शोधून काडून यशवंतरावांनी शास्त्रीजींना त्याचे अध्यक्ष केले. शास्त्रीजींनी अफाट संशोधन आणि मेहनतीने विश्वकोषाचे १८ खंड तयार केले. आज महाराष्ट्रातील सरकारमधील आमदारांना याची कल्पनाही असणार नाही. छातीवर हात ठेवून सांगावे की, किती मंत्र्यांनी आणि किती आमदारांनी वाईच्या प्राज्ञापाठशाळेला भेट दिलीय… माहिती घेतलेली आहे… अभ्यास केला आहे. काही मदत केली आहे… कसली संस्कृती आणि कसलं मंडळ… महाराष्ट्राची संस्कृती भलतीकडेच चालली आहे.

पैशांच्या खेळाने संस्कृतीचा गळा घोटला आहे. एकूणच वातावरण आता ‘पैशाशिवाय निवडणूक नाही’ असे झालेले आहे. सवय-चटक सगळाच काही बदल झालेला आहे. त्यामुळे ‘लोकशाहीतील निवडणूक’ हा एक उपचार ठरेल… अशा अवस्थेत आपण आलेलो आहाेत. महाराष्ट्राला त्याचा राग नाही… संताप नाही… चीड नाही… आणि मतदारांनाही आता त्याचे काही वाटेनासे झालेले आहे. निर्लज्जपणाच्या पलीकडे महाराष्ट्र गेला आहे… बरंं झाले, यशवंतराव हे पहायला नाहीत… त्यांना त्यांचा महाराष्ट्र असा पहावलाच नसता.
महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे याकरिता पाच वर्षे लढा झाला. १०६ जणांनी आपले बलिदान दिले…. तेेच कामगार-तेच शेतकरी पाच-पाच वर्षे लढ-लढ लढले…. ते सगळे नेते त्यात आचार्य अत्रे आहेत, सेनापती बापट अाहेत… डांगे, एस. एम., उद्धवराव, गणपतराव, दादासाहेब गायकवाड, दादासाहेब रूपवते…. ते शाहीर अमर शेख, आत्माराम पाटील किती नावे घ्यावी… महाराष्ट्र राज्य निर्माण झाले… किती खस्ता खावून यशवंतराव आणि अनय नेत्यांनी महाराष्ट्राची बांधणी केली.
भारताची राज्यघटना लिहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘भारतच्या राज्यघटनेविषयी’ एक अत्यंत महत्वाचे भाषण केले होते…. आज त्यातील प्रत्येक शब्द खरा होतोय, असेच वाटते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘भारतात नवोदित झालेली लोकशाही आपले बाह्यांग व्यवस्थितपणे शाबूत ठेवू शकेल… परंतु ती व्यवहारात हुकूमशाहीला आपली जागा बळकवण्यास वाव देईल, असा प्रकार घडून येणे सर्वथैव शक्य आहे. स्वातंत्र्याच्या जोडीला समता नसेल तर ही लोकशाही मुठभर लोकांचीच सत्ता प्रस्थापित करू शकेल… ’
आज डॉ. बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द खरा ठरतो आहे. लोकशाही आहे… आणि तिला ‘पैसाशाही’चा घेराव पडलेला आहे. त्यामुळे समता येणार कशी? आणि या विळख्यातून लोकशाहीची सुटका होणार कशी? त्यामुळे यशवंतरावांच्या पुण्यतिथीला त्यांचे बोट पकडून चालणारा तो महाराष्ट्र आज राहिलेला नाही. आणि पुन्हा तो निर्माण करण्याची कुवत असलेला नेता आता होणे नाही… इतक्या दु:खद निर्णयापर्यंत यावे लागते आहे. शांतपणे बसून जे होईल ते बघयचे…. यापेक्षा आपण अधिक काय करू शकणार आहोत….?

लेखक: मधुकर भावे

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी