लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
नेवासे तालुक्यातल्या सोनई आणि परिसरात आगामी काळात करण्यात येणाऱ्या डांबरी आणि आवश्यकतेनुसार काँक्रीटचे रस्ते, नाल्या, पाणी, पथदिवे, कौतुकी नदीचं सुशोभीकरण आदी पायाभूत सुविधांसाठी 20 कोटींचा निधी देण्याची ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे आणि नेवासा भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांना दिली.
युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनी सोनई आणि परिसराच्या पायाभूत सुविधांची दयनीय अवस्था झाल्याचं पालकमंत्री विखे यांच्या निदर्शनात आणून दिलं. सोनईतले रस्ते जागोजागी उघडले आहेत. या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सोनईच्या मुख्य बाजारपेठेतल्या रस्त्याचीदेखील मोठी दुरावस्था झाली आहे. जुना वांबोरी रस्त्यालगतच्या अमरधाममध्ये पत्रे बसवण्याची आवश्यकता आहे.
सोनईतल्या ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची प्रचंड गैरसोय होत आहे. विकतच पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. मुळा धरणातून पुरेशा दाबाने पाणी येत नाही. पाणीपुरवठा दररोज न होता अनेक दिवसांनी होतो, अशा प्रकारच्या सोनईतल्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. या सर्व तक्रारींचं निराकरण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 20 कोटींचा निधी देण्याची गरज आहे. समाधानाची बाब अशी, की यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करून हा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती ऋषिकेश शेटे पाटील यांनी दिली.
आमदार बदलानंतरच सोनईला मिळणार 20 कोटींचा निधी : ऋषिकेश शेटे पाटील
सोनई हे राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरुक गाव आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते या गावात मित्रत्वाने राहताहेत. मात्र सोनई आणि परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आतापर्यंत कुठलेच प्रयत्न झाले नाहीत. सोनईचा पाणीप्रश्नदेखील प्रलंबित आहे. सर्वच रस्त्यांची वाट लागली आहे. या सर्व समस्यांकडे यापूर्वीच्या आमदारांनी सातत्याने दुर्लक्ष केलं. सुदैवाने आमदार बदलानंतरच सोनईच्या मूलभूत सुविधांसाठी 20 कोटींचा निधी रुपयांचा निधी मिळत आहे, अशी प्रतिक्रिया ऋषिकेश शेटे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.