लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
जेसीबी, पोकलेन या आधुनिक यंत्रसामुग्रीचा बंदोबस्त होताच नेवासे तालुक्यातल्या सोनई – घोडेगाव आणि सोनई – राहुरी या महामार्गालगतच्या अतिक्रमणांसह सोनईतल्या अन्य ठिकाणच्या अतिक्रमणांवर कधीही हातोडा पडला जाऊ शकतो, अशी शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.
संबंधित शासकीय यंत्रणांकडून सोनई – घोडेगाव हा महामार्ग पालखी मार्ग दाखविण्यात आला आहे. तर सोनई – राहुरी हा राष्ट्रीय महामार्ग दाखविण्यात आला आहे. सोनई – घोडेगाव रस्त्याच्या मध्यभागापासून 50 फूट आणि सोनई – राहुरी रस्त्याच्या मध्यभागापासून 36 फूट अंतरावर जे जे अतिक्रमण आहे, ते काढण्यात येणार आहे. यामुळे या दोन्ही महामार्गांचा श्वास मोकळा होणार असला तरी या अतिक्रमणांना जबाबदार कोण, या अतिक्रमणधारकांना अभयदान देणारे कोण, स्थानिक पुढारी की आणखी कोण, हाच खरा प्रश्न आहे.
दरम्यान, सोनईच्या कौतुकी नदीपात्रालगत मोठे अतिक्रमण करण्यात आले आहे. या अतिक्रमणधारकांना दोन वर्षांपूर्वी संबंधित शासकीय यंत्रणांकडून नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. मात्र संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. सोनईच्या बाजारपेठेतल्या विठ्ठल – रुक्मिणी मंदिराचा काही भाग अतिक्रमणात असल्याचं या सूत्रांचं म्हणणं आहे. प्रत्यक्षात सरकारी यंत्रणांकडून नक्की काय पवित्रा घेतला जातो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रितसर आणि सरकारी कागदपत्रं असलेल्यांचा विचार व्हावा…!
अतिक्रमण हटाव मोहीम संपूर्ण राज्यभर सुरु आहे. त्यातल्या त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सर्वच धार्मिक तीर्थस्थळांना जोडणाऱ्या रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्याची तयारी प्रशासनानं केली आहे. अधिकाधिक आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध होताच या अतिक्रमणांवर हातोडा पडणार आहे. मात्र या कारवाईत ज्यांच्याकडे रितसर सरकारी कागदपत्रं आहेत, अशा लोकांचा नक्की विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली जात आहे.