लोकपत डिजिटल न्यूज / अहिल्यानगर
जुगार खेळणं हे सभ्य माणसाचं लक्षण नाही. ज्याला आयुष्यातून उठायचं आहे, सारं काही गमवायचं आहे, सरतेशेवटी कर्जबाजारी व्हायचं आहे, अशा लोकांनी या खेळाला प्रचंड महत्व दिलं आणि ते संपले. जुगार खेळविणारे मात्र दिवसेंदिवस ‘मालामाल’ होत आहेत. नेवासे तालुक्यातल्या सोनईजवळ असलेल्या एका वाडीतल्या तरुणावर अक्षरशः स्वतःचं तोंड झोडून घेण्याची वेळ आली आहे.
स्थानिक पोलिसांचं लक्ष वेधण्यासाठीच सोनईतल्या ‘बिंगो’चा झटका, तरुणाला बसलाय एक लाख 75 हजारांचा फटका, या मथळ्याखाली आम्ही ही बातमी देत आहोत. या निमित्तानं सोनई पोलीस ठाण्याच्या एपीआय माळी यांना आम्हाला जाहीरपणे विचारायचंय, की कधी करताय कारवाई?
सोनईतल्या दहाव्याच्या ओट्याकडे तोंड करून असलेल्या गाळ्यांमध्ये बिंगो नावाचा जुगार सध्या जोमात आहे. विशेष म्हणजे या धंद्यात शिंदे आडनावाचा पोलीस कर्मचारीच ‘पार्टनर’ असल्याची जोरदार चर्चा सोनई आणि पंचक्रोशीत रंगली आहे. या बिंगोच्या जुगारावर पैसे लावण्यासाठी आणि स्वतःच्या आयुष्याची बरबादी करण्यासाठी एका तरुणाने याठिकाणी नशिबाची परीक्षा पाहण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. सुरुवातीला त्याला या बिंगो जुगारात चक्क एक लाख रुपये मिळाले. त्याची हिंमत वाढली आणि एक लाखाचे दहा लाख कसे होतील, यासाठी त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने ते एक लाख परत लावले पण त्याच्या दुर्दैवाने तो हरला आणि स्वतःचं वाहन विकून बिंगो चालकाला झक मारत त्या तरुणाने एक लाख 75 हजार रुपये दिले.
जुगाऱ्यांनी केलाय बदनाम दहाव्याचा ओटा…!
सोनईतल्या दहाव्याच्या ओट्यावर ज्या दिवशी कोणाचा दशक्रिया विधी नसेल त्यादिवशी याठिकाणी पत्ते खेळणाऱ्यांची मोठी ‘टीम’ गोळा होते. एरवी याठिकाणी भाडोत्री चार चाकी वाहनं लावली जातात. त्या वाहनांच्या आडून सोनई पोलिसांना काहीच दिसत नाही, अशा भ्रमात असणारी मंडळी दिवसभर या ठिकाणी पत्ते झोडत असतात. अशा जुगाऱ्यांना सोनईच्या पोलिसांनी चौदावं रत्न दाखवावं, अशी अपेक्षा या निमित्तानं केली जात आहे.