लोकपत न्यूज नेटवर्क / नेवासा
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देऊन छत्रपती शिवरायांचं हे स्वराज्य आणि या स्वराज्याच्या रयतेवर अतोनात प्रेम करणाऱ्या शिवपुत्र छत्रपती संभाजी राजांच्या अलौकिक त्याग आणि बलिदानाचा धगधगता इतिहास नेवासे तालुक्यातल्या सोनई जवळच्या हनुमानवाडी चौकात जीवंत झाल्याचं पाहायला मिळालं. सकल हिंदू परिवाराच्यावतीनं जागतिक महिलादिनाचं औचित्य साधून ‘छावा’ या चित्रपटाचं आयोजन करण्यात आलं होतं. या चित्रपटाची आजच्या तरुणाईला चांगलीच भुरळ पडल्याचं यावेळी दिसून आलं.
‘छावा’ हा चित्रपट पाहण्यासाठी हनुमानवाडी परिसरातले शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये महिलांची संख्या मोठी होती. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा चित्रपट प्रत्येकाला अंतर्मुख करून गेला. त्यामुळे संपूर्ण चित्रपटाच्या वेळी अभूतपूर्व शांतता पाहायला मिळाली. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी हजारो मावळ्यांसह छत्रपती संभाजीराजे प्राणपणाने लढले.
कपटी आणि क्रूरकर्मा औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांचे अतोनात हाल केले. हातांच्या बोटांची नखे काढली. डोळे काढली. जीभ काढून टाकली. छत्रपती संभाजीराजांच्या संपूर्ण शरीरावर जखमा झालेल्या असताना त्या जखमांवर झाडं भरडं मीठ चोळण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. इतका सारा अमानुष्य छळ झाला तरीही तो सहन करीत छत्रपती संभाजीराजे औरंगजेबासमोर अजिबात झुकले नाहीत. छत्रपती संभाजीराजांची त्याग आणि बलिदानाची भावना आजच्या तरुणाईला प्रेरणा देऊन जात आहे.