Thursday, January 23, 2025

हा तर ‘अदृश्य शक्ती’चा कपटी डाव…! पुरोगामी महाराष्ट्र अशांत करण्याचे उद्योग…! जातीयवादाच्या आगीला घातली जातेय फुंकर…!

बाळासाहेब शेटे पाटील

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर

पुरोगामी महाराष्ट्र अशांत करण्याचं काम अदृश्य शक्तीकडून सुरू आहे. जातीयवादाच्या आगीला फुंकर घालण्याचं काम अदृश्य शक्ती करत आहे. किंबहुना पुरोगामी महाराष्ट्र अशांत करण्याचा कपटी डाव अदृश्य शक्तीकडून रचला जात आहे. हा कोणा  एका राजकीय पक्षाचा आरोप नाही तर ही वस्तुस्थिती आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर पहिला प्रयत्न मराठा आरक्षण. तो फसला म्हणून जातीजातींमध्ये भांडण लावण्याचं काम या अदृश्य शक्तीकडून सुरू आहे. सुदैवानं महाराष्ट्राच्या सत्तास्थानी असलेल्या या राज्याच्या सध्याच्या कारभाऱ्यांना अदृश्य शक्तीचा हा कपटी डाव समजला आहे. मात्र त्यावर नक्की उपायोजना कशी करावी, हे सत्ताधाऱ्यांच्या ध्यानात यायला तयार नाही, ही खरं तर दुर्दैवाची बाब आहे.

जर बारकाईने विचार केला तर तुमच्या लक्षात येईल, की हे सारं कोण आणि कशासाठी करत आहे. मराठा आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाजबांधवांमध्ये भांडणं लावून देण्यात आली. वास्तविक पाहता मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आणि त्यासाठी कायद्यात बदल करण्याची क्षमता राज्याऐवजी केंद्रात आहे. परंतु यासाठी केंद्राकडे भांडण्याऐवजी ही अदृश्य शक्ती महाराष्ट्रातल्या जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असले कपटी डाव रचण्यात आले.

तुम्ही म्हणाल, लोकसभा विधानसभेची निवडणूक आता पार पडली आहे. त्यामुळे अदृश्य शक्ती आता शांत होईल. असले कपटी डाव रचण्यात ही अदृश्य शक्ती कशाला वेळ खर्च करील? पण खरी गंमत तर इथून पुढे सुरू होणार आहे. कारण अवघ्या दोन ते तीन महिन्यांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत कोणता तरी मुद्दा हाती असावा, यासाठी जातीजातींमध्ये मतभेदांचे विष पेरण्याचं काम केलं जात आहे.

महाभारत काळात ‘शकुनी मामा’ हे पात्र कार्यरत होतं. रामायणात ‘मंथरा’ कार्यरत होती. सध्याच्या कलियुगात ‘शुकनी मामा’ची भूमिका ही अदृश्य शक्ती साकारते आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून तुमची आमची हीच जबाबदारी आहे, की सध्याच्या कलियुगातल्या ‘शकुनी मामा’ला नीटपणे ओळखून या ‘शकुनी मामा’ने फेकलेल्या जाळ्यात न अडकता यामध्ये जे अडकले आहेत, त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत रहायचं.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत या आणि अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया आगामी मार्चअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून मिळणारी सत्ता राज्याच्या विधानसभा आणि देशाच्या लोकसभेपर्यंत घेऊन जाते. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक आपापल्यापरीने प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहेत. एक सूज्ञ, सुजाण आणि जबाबदार मतदार म्हणून तुम्ही आम्ही डोळसपणे याकडे पाहायचं आहे, तूर्तास इतकंच. धन्यवाद. 

ताजा कलम :

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख

यांची हत्या झाली. त्या हत्याकांडातले एक वगळता तर सर्वच आरोपी अटकेत आहेत. सीआयडी, एसआयटी आणि बीड पोलीस यावर काम करत आहे. मात्र या हत्याकांडाच्या माध्यमातून एका समाजातली लोक दुसऱ्या समाजातल्या लोकांकडे एकमेकांचे ‘जानी दुश्मन’ म्हणून पाहत आहेत. अर्थात यामध्ये सर्वच नाही. मात्र ठराविक लोकांचा सहभाग आहे. कोण म्हणतं हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरु. कोण म्हणतं, रस्ते काय तुमच्या बापाचे आहेत का?  कोण म्हणतं जशास तसे उत्तर देऊ. हे जे काही चाललं आहे, ते कुठे तरी थांबलं पाहिजे. देशमुख हत्याकांडाचा सर्वत्र निषेध झाला. मात्र या हत्याकांडाचा आता पोलीस तपास सुरू आहे. त्या पोलीस तपासावर विपरीत परिणाम होणार नाही, यासाठी खरं तर दोन्हीही समाजातल्या सर्वच नाही परंतू ठराविक लोकांनी संयम बाळगणं अत्यंत आवश्यक झालं आहे. 

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी