लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
‘संतोष भैया देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा व्हावी. यामध्ये माझा काहीच संबंध नाही. विनाकारण माझं नाव यात गोवण्यात आलं आहे’, अशी सारवा सारव करत वाल्मीक कराड अखेर पोलिसांना शरण आले. कराड यांची ही शरणागतीच असल्याचं सध्या तरी दिसत आहे. पण मग शरण यायचंच होतं तर तब्बल 22 दिवसांनीच का? एवढे दिवस पोलीस खराड यांना अटक का करू शकले नाहीत? पोलीस झोपले होते का? कराड नेमकं कोणाच्या सांगण्यावरून शरण आले? कराडांचा ‘रिमोट कंट्रोल’ नक्की कोणाच्या हातात आहे, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत.
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येमागे कराड यांचा हात असल्याचे बोलले जात होतं. किंबहुना ते या हल्ल्याचे ‘मास्टरमाईंड’ होते असंदेखील त्यांच्याबद्दल बोललं गेलं. दरम्यान, कराड यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पण देशमुख यांच्या हत्येमध्ये माझा काही संबंध नाही, असं सांगणारे कराड 22 दिवस फरार का होते, या प्रश्नाचं उत्तर अद्यापतरी मिळालेलं नाही.
दरम्यान, आज (दि. ३१) सायंकाळी साडेपाचनंतर सीआयडी पोलीस कराड यांना बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्याच्या न्यायालयाकडे घेऊन जायला निघाले. रात्री उशिरा या संदर्भातली सुनावणी करण्याची विनंती सीआयडी पोलिसांनी केज न्यायालयाला केली असून केज न्यायालयानं ती मान्य केली आहे. त्यामुळे सीआयडी पोलीस कराड यांना पुण्यातून घेऊन केजला निघाले आहेत. कराड यांना किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते, याचा निर्णय रात्री उशिरापर्यंत समजणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.