लोकपत न्यूज नेटवर्क / नवीदिल्ली
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला असून फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र ही नवीन योजना सुरु केली आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शेतकरी कार्ड हे शेतकऱ्यांसाठी विशेष ओळखपत्र असून त्यामध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती, शेतजमिनीचा तपशील आणि शेतीसंबंधी सर्व महत्त्वाची माहिती असणार आहे. आधार कार्डप्रमाणेच हे कार्डदेखील महत्त्वाचे असून प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक दिला जाईल.
शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ थेट मिळावा आणि पारदर्शकता वाढावी म्हणून शेतकरी कार्ड सुरु करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचा व्यापक डेटाबेस तयार करणे, सरकारी योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, मध्यस्थांची भूमिका कमी करणे, शेतीविषयक सुविधांचा जलद व सुलभ लाभ देणे, यासाठी खरं तर शेतकरी कार्डची गरज असून ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत.
यासाठी अलीकडील पासपोर्ट साईज फोटो, सुरु असलेला मोबाईल नंबर, आधार कार्ड (मूळ प्रत आणि झेरॉक्स), पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आदी कागदपत्रांची यासाठी आवश्यकता आहे.
शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी तुम्हाला agristack पोर्टलला भेट द्यावी लागेल. त्यात नवीन नोंदणीसाठी ‘Register’ वर क्लिक करा. नोंदणी झाल्यानंतर आवश्यक माहिती भरावी आणि कागदपत्रे अपलोड करावीत. सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल. अशा पद्धतीने ऑनलाईन नोंदणीसुद्धा करता येते.
शेतकरी बांधवांना या कार्डमुळे आर्थिक लाभ मिळेल. उदा. कृषी कर्ज सहज मिळेल, पीक विमा योजनांचा लाभ. अनुदान थेट खात्यात जमा होईल. तसेच विविध सरकारी आर्थिक योजनांचा लाभ मिळेल. शेतीविषयक सुविधा मिळतील जसे की, बियाणे आणि खते खरेदीसाठी विशेष सवलत, आधुनिक शेती उपकरणांवर अनुदान आणि तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळेल.
बाजारपेठ संबंधित लाभ मिळेल. थेट बाजारपेठांमध्ये विक्री करण्याची संधी आणि किमान आधारभूत किंमतीची हमी मिळेल. शेतकरी उत्पादक संघटना (FPO) आणि गटांशी जोडणी हे या शेतकरी कार्डचे फायदे आहेत.