लोकपत न्यूज नेटवर्क / नेवासा / प्रतिनिधी
मुळा धरणाच्या
उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे शेतीला पाणी कधी सुटणार, अशी विचारणा नेवासा तालुक्यातल्या शेतकरी बांधवांमधून होत आहे. याचं कारण असं आहे, अनेकांच्या विहिरी आणि बोअरच्या पाण्याची पातळी खालवली आहे. पाटाला पाणी जर आलं तर पाण्याची पातळी नक्कीच वाढणार. कारण पाटपाण्याचे हे रोटेशन किमान महिनाभर तरी चालणार आहे. त्यामुळे या रोटेशनकडे अनेक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
नेवासे तालुक्यात सध्या ऊस, कांदा, गहू, हरभरा, मका अशी पिकं घेण्यात आली आहेत. या पिकांसाठी मुळा धरणाची इथून पुढची आवर्तनं ही या तालुक्यातल्या शेतकरी बांधवांना अमृतासारखं वाटत आहेत. त्यामुळेच अनेक शेतकरी या रोटेशनची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.
दरम्यान, नेवासा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे
यांच्याशी या सदर्भात संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं, की उद्या अर्थात दि. 18 रोजी नगर जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागाच्या प्रमुख असलेल्या सायली पाटील यांना नागपूरला बोलविण्यात आलं आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि काही अधिकारी तसेच आमदारांची या संदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल. साधारणपणे 22 डिसेंबरनंतर मुळा धरणाचं रोटेशन सुटणार आहे’.
… पण चाऱ्या आणि पोटचाऱ्यांच्या दुरुस्तीचं काय ‘त्या’ निधीचं काय?
मुळा धरणातून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाटपाण्याच्या रोटेशनमध्ये दरवेळी लाखो लीटर पाणी वाया जातं. शेतीच्या कडेला छोटे छोटे बंधारे बांधण्यात आले आहेत. त्या बंधाऱ्यांमध्ये पाटाचं हे पाणीच साचतं. हे एका अर्थाने योग्यच आहे. कारण यामुळे सिंचनाद्वारे विहिरी आणि बोअरच्या पाण्याची पातळी वाढते.
मात्र राज्य सरकारकडून दरवर्षी चाऱ्या आणि पोटचाऱ्या दुरुस्तीसाठी मोठा निधी येत असतो. मात्र या निधीतून चाऱ्या आणि पोटचाऱ्या खरंच दुरुस्त होतात का? हा मोठा संशोधनाचा विषय आहे. 22 डिसेंबर नंतर मुळा धरणाचं आवर्तन सुटणार असलं तरी या निधीचं काय आणि चाऱ्या आणि पोटचाऱ्या दुरुस्तीचं काय, असा प्रश्न अनुत्तरितच आहे.