बाळासाहेब शेटे पाटील
लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
विधानसभेची निवडणूक होऊन चार महिने पूर्ण होत आले आहेत. या चार महिन्यांतला बराचसा काळ सत्कार समारंभात गेला. आता तरी नेवाशात विकासकामांना वेग येईल, अशी भाबडी अपेक्षा नेवाशाच्या जनतेनं बाळगली आहे. मात्र अद्याप तरी नेवासाच्या विकासाकामांसंदर्भात ठोस असं काहीही सुरु झालेलं नाही.
यावेळच्या नेवासा विधानसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक लागला. विठ्ठलराव लंघे यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली. आमदार लंघे यांनी आता कामांना गती देण्याची आवश्यकता आहे. कारण नेवाशाची जनता आमदार लंघे यांच्याकडून वेगळी अपेक्षा घेऊन आहे. या पार्श्वभूमीवर तमाम नेवासकरांच्यावतीनं आम्ही लंघेंना प्रश्न विचारत आहोत, की आमदार विठ्ठलराव लंघे साहेब, नेवाशाचा ‘डीपीआर’ कधी करताय? कारण तसं झालं नाही आणि नुसताच टाईमपास झाला तर उगीचच नेवासकरांचा भ्रमनिरास व्हायचा.
नेवासा तालुका हा महाराष्ट्रात एक मॉडेल विधानसभा मतदारसंघ म्हणून विकसित करण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे यांना फार मोठी संधी आहे. या तालुक्याचा बऱ्याच वर्षांपासूनचा विकासाचा ‘बॅकलॉग’ एका कर्तबगार लोकप्रतिनिधीची वाट पाहत आहे. सुदैवानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून आमदार विठ्ठलराव लंघे यांना या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यामुळे या संधीच सोनं आमदार लंघे यांनी करावं, अशी अपेक्षा या तालुक्यातल्या जनतेकडून व्यक्त केली जात आहे.
या तालुक्यात शनिशिंगणापूर, देवगड अशी प्रसिद्ध देवस्थानं आहेत. या देवस्थानांकडे जाण्यासाठी प्रशस्त महामार्ग होण्याची आवश्यकता आहे. या तालुक्यात लघुउद्योग आणण्याची आवश्यकता आहे. या तालुक्यात विमानतळ व्हावं, अशीदेखील अनेकांची इच्छा आहे. हे सारं मूर्त स्वरूपात आणण्यासाठी पाच वर्षांचा कार्यकाळ पुरेसा ठरणार नाही. मात्र त्यासाठी आमदार लंघे यांनी आतापासूनच कामाला गती देण्याची आवश्यकता आहे.
या तालुक्यातल्या काही ठिकाणच्या रस्त्यांची कामं अतिशय धिम्या गतीनं सुरू आहेत. उदाहरणच द्यायचं ठरलं तर सोनई – कांगोणी रस्त्यावर दोन ठिकाणी पुलाचं काम झालं असलं तरी या रस्त्याचं काम रखडलं आहे. यामध्ये नक्की काय समस्या येत आहेत, निधी मिळत नाही का, आतापर्यंत या तालुक्याला राज्य सरकारकडून किती निधी मिळाला, अर्थसंकल्पीय अधिवेशनात नेवासा तालुक्याला कशा पद्धतीने विकासनिधी देण्यात आला, या तालुक्याच्या विकासासाठी किती निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली, आतापर्यंत किती निधी या तालुक्याला मिळाला, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं नेवाशाच्या जनतेला हवी आहेत.
नेवासा तालुक्यातल्या रस्त्यांच्या रखडलेल्या कामांसह घोडेगावची पाणी योजनासुद्धा रखडली आहे. त्याचप्रमाणे सोनईची पाणी योजनासुद्धा मरणयातना सहन करत आहे. या योजनेला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी आमदार लंघे यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
या तालुक्यात अतिक्रमणांचा ‘जेसीबी’ आणि ‘पोकलेन’ फिरणार असल्यानं व्यापारी आणि व्यावसायिक धास्तावले आहेत. या सर्वांना आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिलासा द्यावा, अशी मागणीही होत आहे. ही अतिक्रमण मोहीम नक्की कधी सुरु होणार आहे, ही मोहीम कशी असणार आहे, या अतिक्रमण मोहिमेमुळे विस्थापित होणाऱ्यांना खरंच न्याय मिळणार आहे का, असे अनेक प्रश्न नेवाशाच्या जनतेसमोर ‘आ’ वासून उभे ठाकले आहेत. मात्र यावर आमदार लंघे कुठल्याही प्रकारचं भाष्य करायला तयार दिसत नाहीत.
निदान तुम्ही तरी मतदारांना गृहीत धरु नका…!
विधानसभेची निवडणूक झाली. निकाल लागला. विजयी होण्याच्या वल्गना करणारे पराभूत झाले. अनपेक्षितपणे विठ्ठलराव लंघे तब्बल 24 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या तालुक्याचे आमदार झाले. मात्र आतापर्यंत या तालुक्यातल्या मतदारांना केवळ गृहीतच धरण्यात आलं. कामं कधी, कशी, कोणाची करायची, हे स्वतःच्या पद्धतीनंच ठरविलं जायचं. कार्यकर्त्यांपेक्षा स्वहित जपलं जायचं. सत्तेचा गैरवापर करून कार्यकर्त्यांची जिरवली जायची. कारण एकदा निवडून आल्यानंतर पाच वर्षे आपलं कोणीच वाकडं करू शकत नाही, अशा विचारात असलेल्या लोकांनी मतदारांचा अजिबात विचार केला नाही. आमदार लंघे यांचा स्वभाव तसा नाही. ते सरळमार्गी काम करणारे नेते आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून मात्र या तालुक्यातल्या मतदारांच्या खूप वेगळ्या अपेक्षा आहेत. म्हणूनच निदान आमदार लंघे यांनी तरी नेवासा विधानसभा मतदार संघातल्या मतदारांना गृहीत धरु नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.