लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारचं नक्की काय चाललंय, हे कळायला सध्या तरी कोणताच मार्ग नाही. राज्य सरकारने एक वेगळा आदेश दिला आहे. यापुढे विद्यार्थ्यांना 26 जानेवारीची सार्वजनिक सुट्टी मिळणार नाही. तर 26 जानेवारीच्या दिवशी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर दिवसभर शाळा सुरू राहील आणि शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करा, असे निर्देश राज्य सरकारमार्फत शाळांना देण्यात आले आहेत. पण यावेळी 26 जानेवारी ही रविवारी आहे, याचं भान या सरकारला आहे की नाही, हाच मोठा प्रश्न आहे. कदाचित सरकारचा हा निर्देश या पुढील काळात येणाऱ्या 26 जानेवारीसाठी असावा.
26 जानेवारी या दिवशी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रजासत्ताकदिन साजरा केला जातो. या दिवशी शाळेमध्ये ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते. मात्र यापुढे ही सुट्टी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 26 जानेवारीला विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळेतच विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करत विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढीस लागावी, यासाठी प्रयत्न करण्याची निर्देश राज्य सरकारने राज्यभरातल्या शाळा व्यवस्थापकांना दिले आहेत.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी एक परिपत्रक जारी केलं आहे. 26 जानेवारीची शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी न देता सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये दिवसभर देशभक्ती थीमसह विविध स्पर्धा आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्याची निर्देश या परिपत्रकात देण्यात आले आहेत. 26 जानेवारीच्या दिवशी शाळेत कोणकोणते कार्यक्रम घ्यावेत, यासाठी आठ स्पर्धा आणि कार्यक्रमाची यादी राज्यातल्या शाळांमध्ये देण्यात आली आहे.
… तर मग रविवारीदेखील भरणार का शाळा?
राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी जो आदेश काढलाय, त्या आदेशानुसार शालेय विद्यार्थ्यांना 26 जानेवारीची सार्वजनिक सुट्टी देण्यात येऊ नये. त्याऐवजी शाळेमध्येच विविध स्पर्धांचे आयोजन करावे. देशभक्तीपर कार्यक्रमाचेदेखील आयोजन करावं, असं राज्य सरकारच्या परिपत्रकात म्हटलं आहे. मात्र यावर्षी 26 जानेवारी रविवारच्या दिवशी येत असून या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते. पण मग सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं जो आदेश दिला आहे, त्या आदेशानुसार रविवारीदेखील शाळा सुरू राहणार का, असा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जात आहे.