लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
नेवासे तालुक्यातल्या सोनई गावातल्या एका प्रसिद्ध चहावाला आणि चष्मा विक्री दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेल्या एका वित्तीय संस्थेतल्या अधिकाऱ्यांनी दैनंदिन बचत ठेव खात्यांचं कलेक्शन करणाऱ्या एका तरुणाची प्रचंड आर्थिक फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. या घाणेरड्या प्रकाराला वैतागून संबंधित तरुण पोलीस आणि संबंधित वित्तीय संस्थेच्या अध्यक्षासह अधिकाऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता या वित्तीय संस्थेच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याच्या पवित्र्यात असल्याचं बोललं जात आहे.
या वित्तीय संस्थेत संबंधित तरुणाचं बचत खातं असून त्यामध्ये एक लाख रुपये होते. परंतू, या वित्तीय संस्थेच्या अधिकाऱ्यांनी मनमानी करत या तरुणाच्या बचत खात्यातले एक लाख रुपये त्रयस्थ खातेदाराच्या खात्यामध्ये वर्ग केल्याचा पराक्रम केला असल्याची या तरुणाची तक्रार आहे.
वास्तविक पाहता त्रयस्थ व्यक्तीच्या खात्यामध्ये एक लाख रुपये वर्ग करण्यापूर्वी या तरुणाच्या सह्या आवश्यक असताना कुठंही या तरुणाच्या सह्या घेण्यात आलेल्या नाहीत. हा तरुण बाहेरगावी असतानादेखील या वित्तीय संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सदर तरुणाच्या खात्यातली एक लाख रुपयांची रक्कम परस्पर त्रयस्थ व्यक्तीच्या सोनईतल्या याच वित्तीय संस्थेच्या खात्यात वर्ग केली.
दरम्यान, या तरुणाने संबंधित वित्तीय संस्थेच्या कार्यालयात वारंवार पाठपुरावा करून पासबुक भरण्याची या वित्तीय संस्थेच्या अधिकाऱ्यांना विनंती केली. याशिवाय सेव्हिंग स्टेटमेंटदेखील मागितलं. मात्र संबंधित संस्थेच्या अधिकाऱ्यांनी या तरुणाला सातत्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली.
या वित्तीय संस्थेचा अध्यक्ष हा महाराष्ट्रातल्या अनेक सहकारी संस्थांच्या संघटनेचा मोठा पदाधिकारी आहे. सामाजिक कार्याचा आणणाऱ्या या वित्तीय संस्थेच्या अध्यक्षाची राजकीय मंडळींमध्ये सतत उठ बस असते. राजकीय नेत्यांच्या पाठबळावर या वित्तीय संस्थेचा अध्यक्ष कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा करत आहे.
मात्र दैनंदिन बचत ठेवींचं कलेक्शन करणाऱ्या या तरुणावर संबंधित वित्तीय संस्थेकडून मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. मध्यंतरी, या तरुणाचं मोठं ऑपरेशनदेखील झालेलं आहे. वैद्यकीय उपचारासाठी या तरुणाला पैशांची नितांत आवश्यकता आहे. अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू असलेल्या या तरुणाला आर्थिकदृष्ट्या लुटण्याचा संबंधित वित्तीय संस्थेच्या अधिकाऱ्यांनी एक वेगळाच आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यामुळे या वित्तीय संस्थेच्या अधिकाऱ्यांना साई नक्कीच माफ करणार नाही, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे हा तरुण अनेक दिवसांपासून ‘डायलिसिस’वर आहे. अशा परिस्थितीत त्याला मदत करण्याऐवजी या वित्तीय संस्थेकडून त्याची आर्थिक लूट करण्यात आली आहे. एकीकडे, दवाखान्यात उपचारासाठी या तरुणाकडे पैसे नाहीत. तर दुसरीकडे या वित्तीय संस्थेने केलेल्या आर्थिक फसवणुकीमुळे हा तरुण हवालदिल झाला आहे.
अशा विचित्र परिस्थितीत कुठलाच पर्याय शिल्लक राहिला नसल्यामुळे कोणालाही पूर्वसूचना न देता या संस्थेच्या कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याच्या पवित्र्यात हा तरुण आहे.
या वित्तीय संस्थेने आपले पैसे व्याजासह द्यावेत. अन्यथा या संस्थेतल्या आर्थिक घोटाळ्यांची माहिती संपूर्ण महाराष्ट्रभर देण्यासाठी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसह राज्य आणि केंद्रीय सहकार निबंधक कार्यालयांकडे रितसर तक्रार करण्याचा या तरुणाचा निर्धार आहे. दरम्यान, सोनई पोलिसांनी या तरुणाची मानसिकता लक्षात घ्यावी आणि संबंधित वित्तीय संस्थेच्या अध्यक्षासह अधिकाऱ्यांची कानउघाडणी करावी, अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली जात आहे.