लोकपत न्युज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी / मुंबई /
राज्यातल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीला आतापर्यंत तीन वेळा स्थगिती देण्यात आली आहे. जवळपास आठ महिन्यांपासून 28 हजार सहकारी संस्था निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांनी शासनाला अहवाल पाठवला आहे.
विधानसभेची निवडणूक झाली असल्यामुळे आता या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, असं आयुक्त कवडे यांनी या प्रस्तावात म्हटलं आहे. दरम्यान, शासनाने हिरवा कंदील दाखवल्यानंतरच या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे.
यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार 31 डिसेंबर 2024 पर्यंत राज्यातल्या 28 हजार सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आलेली आहे. लोकशाही मार्गाने निवडणूक होऊन सहकारी संस्थांमध्ये संचालक मंडळ अस्तित्वात येईल. त्यामुळे राज्यातल्या सहकारी संस्थांच्या संचालकांना शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.