लोकपत न्यूज नेटवर्क / शेवगाव प्रतिनिधी /
गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त ‘रिटर्न्स’ देण्याच्या आमिषापोटी 33 लाख 55 हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या शेअर मार्केटच्या भामट्यांना शेवगाव पोलिसांनी शिताफीनं अटक करत मोठी अभिनंदनीय कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या कारवाई दरम्यान काही संशयित आरोपी पळून जात असताना अक्षरशः दुचाकीवरुन पाठलाग करून त्यांना पकडण्यात आलं. शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांचं खरं तर या कामगिरीबद्दल जाहीर अभिनंदन. मात्र या कारवाईनंतर संबंधित भामट्यांकडून शेवगाव पोलिसांना ठोस माहिती मिळेल का, ज्यांची आर्थिक लूट झाली त्यांना न्याय मिळेल का, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
शेवगाव पोलिसांनी अवधूत विनायक केदार (रा. साई कृपा नगर आखेगाव तालुका शेवगाव) यांच्या फिर्यादीवरून सखाराम नामदेव ढोरकुले (रा. बाबुळगाव तालुका शेवगाव) आणि फ्रान्सिस सुधाकर मगर (आखेगाव रोड, शेवगाव) या दोघा संशयितांना अटक केली.
या संदर्भात फिर्यादी अवधूत केदार यांनी सांगितलं, की गुरुकृपा ट्रेडिंग इन्व्हेस्ट शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास जास्तीत जास्त परतावा (रिटर्न्स) देतो, असं ढोरकुले आणि मगर या दोघांनी आमचा विश्वास संपादन करत आम्हाला सांगितलं. यावर विश्वास ठेवत आम्ही 33 लाख 55 हजार रुपये या दोघांकडे दिले. परंतु वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील या दोघांनी रक्कम द्यायला टाळाटाळ केली. त्यामुळे शेवटी नाईलाजास्तव शेवगाव पोलीस ठाण्यात आम्ही धाव घेतली.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण महाले, पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे, पोलीस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ, संतोष वाघ, राहुल खेडकर, धनेश्वर पालवे, प्रशांत आंधळे, देविदास तांदळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू आदींनी ही कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण महाले अधिक तपास करत आहेत.
पण या कारवाईला इतका उशीर का झाला?
शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या शेअर मार्केटच्या फसवणुकीची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. यामध्ये अनेकांची आर्थिक फसवणूक झालेली आहे. शेवगावच्या परिसरात ठिकठिकाणी सुसज्ज कार्यालये थाटून भोळ्या – भाबड्या लोकांची यामध्ये आर्थिक लूट झाली आहे. मात्र या संदर्भात आरोपींच्या अटकेची जी कारवाई यापूर्वीच व्हायला हवी होती, मात्र त्यासाठी बराच उशीर झाला. हा उशीर का आणि कोणामुळे झाला, याची चर्चा आता शेवगावमध्ये ऐकायला मिळत आहे.
बातम्या आणि जाहिरातींसाठी कृपया
70 28 35 17 47 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.